कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी नुकतीच शिक्षक भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे फुल झाली असून उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे. शिक्षणमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात या परीक्षेसाठीचे केंद्र सुरू करू शकतील का? असा सवाल मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,शिक्षण मंत्र्यांनी राज्यात शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केली. शिक्षक भरती करताना सीटीईटी परीक्षा अनिवार्य आहे, हे शिक्षण मंत्र्यांना माहीत असेलच. मात्र सिंधुदुर्गातील मुलांना जुलै मध्ये होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी राज्यातील एकही सेंटर मिळत नाही. सद्यस्थितीत ही सेंटर फुल दाखवण्यात येत असून सिंधुदुर्गातील मुलांना गुजरात, अहमदाबाद, बेंगलोर वगैरे ठिकाणी सेंटर उपलब्ध असल्याचे ऑनलाईनला दिसत आहे. त्यासाठी सेंटर निवडण्याची अंतिम मुदत २६ मे असून त्या अगोदरच सर्व सेंटर फुल दिसत आहेत.वास्तविक शिक्षण मंत्र्यांचा स्वतःचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग मध्ये किंवा निदान रत्नागिरीमध्ये तरी या परीक्षेसाठीचे सेंटर असण्याची गरज होती. परंतु या ठिकाणी सेंटर सुरू करणे सोडाच पण राज्यातीलही सेंटरवर मुलांना प्रवेश मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती नसल्याने प्रतीक्षेत असलेले उमेदवार अगोदरच अडचणीत असताना शिक्षण मंत्री त्यांना सिंधुदुर्ग मध्ये या परीक्षेसाठीचे सेंटर सुरू करून देऊ शकतील काय? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.सिंधुदुर्ग मधील मोठ्या प्रमाणात डी.एड. झालेले बेरोजगार या सीटीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र,ऑनलाईनने सेंटर निवडण्यास गेल्यास परराज्यातील सेंटर उपलब्ध होत असल्याने अनेक उमेदवार अडचणीत आहेत. यातील काहींनी आपल्याशी संपर्कही साधला. त्यामुळे शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर निदान स्वतःच्या जिल्ह्यात तरी हे सेंटर सुरू करू शकतात का ?हे पाहायचे आहे असेही परशुराम उपरकर यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शिक्षणमंत्री सिंधुदुर्गात सिटीईटी परीक्षा केंद्र सुरू करतील का?, परशुराम उपरकर यांचा सवाल
By सुधीर राणे | Published: May 10, 2023 5:16 PM