कणकवली : कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. यात कोकण विभागाचा आढावा घेऊन येत्या तीन महिन्यात कोकण विकास पर्यटनाचा रोडमॅप बनवणार असल्याची माहिती कोकण पर्यटन विकास समितीचे नूतन उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व नेत्यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले.कोकण पर्यटन समिती उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा शिवसेनेच्यावतीने मध्यवर्ती कार्यालय येथे त्यांचा आज, मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याबरोबरच कोकणातील सर्व पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. शासनाच्या माध्यमातून पर्यटन विकास करण्यात येईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणला पुन्हा ताकद देण्यासाठी ही मला संधी दिली आहे या संधीचे सोने केले जाईल. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी येथे विविध प्रकल्प राबवा अशी मागणी करणार असल्याचेही पारकर यांनी सांगितले.यावेळी जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी संदेश पारकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनीही सत्कार केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सचिन सावंत, शहराध्यक्ष चंद्रशेखर राणे, संजय पारकर, सुनील पारकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणच्या विकासासाठी पर्यटनाचा रोडमॅप बनवणार - 'कोपविस'चे उपाध्यक्ष संदेश पारकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 4:15 PM