कणकवली : राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.कणकवलीत झालेल्या नलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर आमदार नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.यावेळी आमदार नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राणे पितापुत्रांनी विकासाचा नारा दिला होता. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष कणकवली शहरातून दांडे घेऊन फिरत आहेत.
दुसरे एक नगरसेवक आपल्या फ्लॅटधारकांना गोळीबार करून धमकावत आहेत. नुकतेच स्वाभिमान शहराध्यक्षपदी विराजमान झालेले घरातून भाडेकरुना बाहेर काढत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियाना त्यांची संस्कृती दिसून आली आहे.राणेंच्या कार्यकर्त्यांच्या याच राडेबाजीमुळे त्यांना कुठला पक्ष जवळ करीत नाही. आता सिंधुदुर्ग जिल्हयापुरता मर्यादीत असलेल्या स्वाभिमान पक्षाचा राडेबाजी हाच एकमेव अजेंडा राहिला आहे. तसेच स्वाभिमानचे कुठलेही पद घेतल्यानंतर राडेबाजी करायलाच हवी असे नूतन पदाधिकाऱ्यांच्या राडेबाजीतील सहभागावरुन दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गवासीय स्वीकारणार नाहीत.कणकवली शहरात बसविलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते सुरु करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर अशा घटनाना आळा बसेल. जिल्हा नियोजन मधून 20 लाखांचा निधी मंजूर झाला असुन कुडाळ आणि कणकवली येथे लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील .असेही यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले.आम्ही दहशतवादाच्या विरोधात !यापूर्वीही अनेक वेळा शिवसेना दहशतवादाच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही दहशतीचा प्रकार झाला तर शिवसेना त्याविरोधात ठामपणे उभी रहाणार आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करणारे कोणत्याही पक्षाचे असतील तर त्याला आमचा विरोध राहील. दहशत रोखण्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. असे यावेळी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान वैभव नाईक यानी सांगितले.