कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या दोघांनी युती करून या जिल्ह्याला लुटायचे ठरविले असून, हे जिल्ह्यासाठी तारक नाहीत तर मारक आहेत. अशी त्यांची कार्यपद्धती आहे. यापुढे त्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. लाठीचार्ज करून ज्या अधिकाऱ्यांनी माझ्या कार्यकर्त्यांचे रक्त सांडले, त्यांना मी कधीच सोडणार नाही. उगाच माझ्या नादी लागू नका. महाराष्ट्रातून हरियाणात जावे लागेल, असा सज्जड इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.ओरोस येथील शरद कृषी भवन मध्ये डंपर चालक मालक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, आनंद शिरवलकर, संदीप कुडतरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, विकास कुडाळकर, प्रणिता पाताडे, रवींद्र नाईक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, जिल्ह्यात चोऱ्या, जुगार, दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तेथे पोलिसांना मर्दुमकी गाजविता येत नाही, असा आरोप करताना हे अवैध धंदे आपण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उघड करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी जाहीर केले. या जिल्ह्यात आलेले जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. या अधिकाऱ्यांनी उगाचच माझ्या नादी लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला.पोलिसांचा दंडका हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी असतो, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. आमच्या करातून तुमचा पगार होतो. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे लक्षात ठेवून नोकरी करा. तुमच्या आदेशाने झालेल्या लाठीहल्ल्यात माझ्या कार्यकर्त्यांचे रक्त सांडले, ते मी आयुष्यभर विसरणार नाही. याच हल्ल्यात लाठीमुळे कार्यालयाच्या काचा फुटल्या. त्या बदलता येतील, पण कार्यकर्त्यांवर झालेल्या जखमेचे घाव भरून घेणार नाही, असा इशारा देतानाच राणे पुढे म्हणाले, चोऱ्या, जुगार, दारू व्यवसाय जोरात सुरू आहेत. त्याठिकाणी जाऊन पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने असे फलक लावण्याचे काम उद्यापासून सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
‘त्या’ अधिकाऱ्यांना सोडणार नाही : नारायण राणे
By admin | Published: March 06, 2016 11:14 PM