कणकवली: रिफायनरी प्रकल्प, सीवर्ल्ड किंवा कोकणात येणाऱ्या सर्व उद्योगांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जातो. मात्र, त्यानंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी तोडपाणी केली जाते. एन्रॉनबाबतही शिवसेनेने तोडपाणी केली होती. असा आरोप करतानाच आम्ही जनतेची विकास कामे करतो. उगाचच टीका कोणावर करीत नाही.त्यामुळे यापुढे महाराष्ट्र ते दिल्ली पर्यंतच्या भाजप नेत्यांवर कोणी विनाकारण टीका करेल तर त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर जाऊ देणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार नीतेश राणे , जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी उपस्थित होते.शिवसेना मातोश्री पुरतीचयावेळी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही. महाराष्ट्र बंद करेन, बाकी काय बोलणार? उद्धव ठाकरे यांच्या जवळ कोण आहे ? त्यांचे 'पिल्लू' टीका करीत असून दिशा सालीयन प्रकरणातून तो सुटणार नाही. जनतेला विकास पाहिजे असेल तर टोल द्यावा लागेल. त्याशिवाय विकासकामांना निधी कसा मिळणार? सी वर्ल्ड प्रकल्प आम्ही आणणार आहोत. विनायक राऊत यांनी त्याला विरोध केला. मात्र आता सत्ता आमची असून आम्ही तो प्रकल्प आणू.भारत जोडो यात्रेच्या वेळी भाजपवर टीका केली गेली. त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. देशात, राज्यात बरीच वर्षे काँगेसची सत्ता होती. त्यांनी काय केले? टाळबा, महंम्मदवाडी, तिलारी प्रकल्प लवकरच पूर्ण होतील. काही तांत्रिक बाबी तसेच जमिनीचा प्रश्न आहे. तो सोडविला जाईल. धरण आणि केटी बंधारे यातील फरक वैभव नाईक यांना माहीत नाही. त्यामुळे ते मोठे धरण नको असे म्हणतात. वि.स.खांडेकर यांची जमीन त्यांच्या वारसांना निश्चित मिळवून देऊ. मात्र, त्यांच्यापैकी कोणी तरी नेमकी काय समस्या आहे, ते आमच्यासमोर मांडले पाहिजे. रोजगार देणारा प्रकल्प होत असेल तर आमचा त्याला पाठींबाच असेल.सीमाप्रश्नासाठी राष्ट्रवादीने काय केले?महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी अजित पवार यांनी काय कार्य केले आहे? त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाबाबत काय केले? ते आधी सांगावे. त्यामुळे त्यांना या विषयाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार येथील एक इंचही जमीन कोणाला देणार नाही. या प्रश्नासाठी पहिले आंदोलन झाले. त्यात मी सहभागी झालो होतो. राज्याच्या जनतेला सुख समाधान मिळावे, यासाठी देवीच्या चरणी मागणे मागण्यासाठी शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेले आहेत.तर त्यात काय वाईट आहे? असेही राणे म्हणाले.ग्रामपंचायत निवडणुकीतील युतीचा निर्णय पक्ष पातळीवर होणारआगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत भाजपाने युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठ वर्षात जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपने राज्यात २०० जागा जिंकाव्यात असा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.अंधारे ताईला भरपूर प्रसिद्धी मिळालीयापूर्वी सिंधुदुर्गात चाकरमानी फेब्रुवारी महिन्यात येत नसायचे, कारण पाण्याची मोठी समस्या असायची. कोणामुळे येथील रस्ते झाले? शिक्षणविषयक सुविधा, टँकर मुक्त जिल्हा कोणामुळे झाला? हे जाणून घ्या. मात्र, त्याचे कौतुक कोणी करीत नाही. याउलट जिल्ह्यात येऊन आमच्यावर विनाकारण टीका करणाऱ्या त्या ताईला भरपूर प्रसिद्धी मिळाली असा टोला प्रा.सुषमा अंधारे यांचे नाव न घेता नारायण राणे यांनी लगावला.
विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम
By सुधीर राणे | Published: November 26, 2022 6:07 PM