वेंगुर्ले : येथील जागृती क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे ‘पाणी साठवा गाव वाचवा’ हे अभियान यावर्षी राबविणार असल्याची माहिती जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली.जागृती मंडळातर्फे याआधी वसुंधरा बचाव, तंटामुक्ती गाव मोहीम, लेक वाचवा, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रध्दा निर्मूलन, क्रीडा अभियान आदी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांना सहकार्य करण्यात आले आहे. कमी प्रमाणात पडणारा पाऊस, वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी यामुळे पाणीटंचाई वाढलेली आहे. याची जाणीव ठेवत पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करण्याबाबत जागृती जनमाणसात रुजविण्याकरिता जागृती मंडळ कार्य करणार आहे. या अभियानाचा शुभारंभ १0 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. पाणी वापरात समन्वय, एकसूत्रता आणण्याकरिता, जलसाठा संचलित करणे, पाणीटंचाईवर मात करणे यासाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याने जागृती मंडळातर्फे वेंगुर्ले तालुक्यात पाणी साठवून गाव वाचविण्याची मोहीम राबवून प्रचार व प्रसार गावागावात करण्यात येणार आहे. यासाठी रॅली, दौड, चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धेचाही प्रचारात वापर केला जाणार आहे. गावागावात पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गावागावात तेथील युवक मंडळे, महिला मंडळे, बचत गट, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून गावागावातील पाणीसाठ्याचा भविष्यात समान वापर तंत्रशद्ध पद्धतीने करतानाच विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीतून समन्वय राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीची गरज लोकांना पटवून देण्यात येणार आहे. जागृती मंडळाच्या या पाण्याच्या संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अध्यक्ष संजय मालवणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविणार : मालवणकर
By admin | Published: August 31, 2014 10:02 PM