बांदा : डेगवे येथील विविध प्रलंबित समस्या डेगवे-ग्रामस्थ हितवर्धक संघाने खासदार विनायक राऊत यांच्यासमोर मांडल्यानंतर या समस्या लवकरात लवकर दूर करण्यात येतील, असे आश्वासन खासदार राऊत यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले.डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघाचे सरचिटणीस उल्हास देसाई यांच्या नेतृत्वाखाली खासदार राऊत यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी डेगवेतील श्री देव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिरास धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून मंजुरी देऊन परिसराच्या विकासासाठी निधी देण्याची विनंती करण्यात आली.स्थापेश्वर मंदिरासमोरील व जुन्या सोसायटीसमोर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावी, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, मैदान यासह गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तसेच जीर्ण वीज खांब व तारांची दुरुस्ती, नळपाणी योजना, मोबाईल टॉवर उभारणे, वाडीनिहाय पथदीप बसविणे, नंदादीप वाचनालयाच्या सभागृहास निधी आदींची लेखी निवेदनाद्वारे मागणी खासदार राऊत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी नितीन देसाई, बाळा केरकर, जनार्दन देसाई, हरिश्चंद्र देसाई, गुणाजी देसाई, गोपाळ वराडकर, अशोक देसाई, रमेश पडवळ, अरुण देसाई, वाचनालयाचे अध्यक्ष पुरुषोत्तम देसाई, कार्यवाह उल्हास देसाई उपस्थित होते.खासदार राऊत यांनी या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याशी संपर्क साधत त्यांना याबाबत पाठपुरावा करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)
डेगवेतील समस्या सोडविणार
By admin | Published: November 19, 2015 9:03 PM