सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद स्वउत्पन्नातील २२ कोटी ९९ लाखांपैकी फेब्रुवारीअखेर विविध विभागांचा ९ कोटी ५७ लाख रूपयांचा निधी खर्च केला आहे. सध्या लेखासंवर्गीय कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू असले तरी मार्च अखेरपर्यंत १०० टक्के निधी खर्च केला जाईल असा विश्वास मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी वित्त समिती सभेत व्यक्त केला.जिल्हा परिषद वित्त समितीची मासिक सभा सभाध्यक्ष सुरेश ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुभाष नार्वेकर, सुगंधा दळवी, समिती सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारूती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.वित्त विभागाकडून जिल्हा परिषद स्वउत्पन्नातील चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा देण्यात आला. स्वनिधीतील २२ कोटी ९९ लाखांपैकी विविध विभागांनी फेब्रुवारीअखेर ४२ टक्केच म्हणजे ९ कोटी ५७ लाख रूपयांचा निधी खर्च केला आहे. निधी खर्च करण्यात कोणता विभाग आघाडीवर अथवा कोणता विभाग पिछाडीवर आहे याची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली. दरम्यान निधी खर्चाची माहिती देताना वित्त अधिकारी मारूती कांबळे म्हणाले, सध्या जिल्हा परिषद लेखासंवर्गीय कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरू आहे. याचा परिणाम निधी अखर्चित राहण्यावर होणार नाही. सुट्टीच्या दिवसातदेखील वित्त विभाग जोमाने काम करत आहे. कामे रखडणार नाहीत तसेच निधी मार्च अखेरपर्यंत १०० टक्के खर्च केला जाणार असल्याची ग्वाही कांबळे यांनी दिली.कुसबे येथील सुपुत्र व मुंबईचे सेनेचे महापौैर विश्वनाथ म्हाडेश्वर यांच्या अभिनंदनाचा ठराव वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी सभागृहात मांडला. यावेळी सभाध्यक्ष सुरेश ढवळ यांच्यासह सर्व सदस्यांनी या ठरावाला मान्यता दिली. एम.पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण होऊन तहसीलदार पदासाठी निवड झालेल्या चैताली सावंत यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आला. (प्रतिनिधी)धोकादायक शाळांची डागडुजी प्राधान्याने करागतवेळच्या बैठकीत जिल्ह्यातील धोकादायक स्थितीत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची यादी सादर करण्याचे आदेश सभाध्यक्ष सुरेश ढवळ यांनी दिले होते. मात्र ती यादी सभागृहात सादर न केल्याने बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त करण्यात आली. तत्काळ अशा शाळांचा प्रस्ताव तयार करून प्राधान्यक्रमाने सर्व शाळांची डागडुजी करा, असे आदेश सुरेश ढवळ यांनी दिले.विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. वास्तविक पाहता या कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. या मागण्या पूर्ण व्हाव्यात यादृष्टीने शासनाने दखल घ्यावी. त्यादृष्टीने तसा प्रस्ताव शासनास पाठवावा. लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वित्त समितीचा पाठिंबा असल्याचेही यावेळी सुरेश ढवळ यांनी सांगितले.
१00 टक्के निधी खर्च करणार
By admin | Published: March 18, 2017 10:42 PM