कणकवली : मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. त्यामुळे शेवटचा आमदार जरी शिंदे गटात गेला तरीही मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहे अशी आपली भूमिका आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली आहे.महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरु असताना माजी राज्यमंत्री दीपक केसरकर व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यांच्या भेटीची छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना वेग आला. याविषयी सिंधुदुर्गचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या भावी वाटचाली विषयी भूमिका स्पष्ट केली.शिंदे यांच्या गटात राज्यातील शिवसेनेचे मंत्री, आमदार सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे मंत्री उदय सामंत शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेसाठी आणखी एक मोठा धक्का बसला. मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीतून विधानसभेवर निवडून आले असले तरी ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. मंत्र्यांसह आमदार मोठया संख्येने शिंदे यांच्या गोटात दाखल होत असताना सिंधुदुर्गच्या शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक हे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
सामंत-केसरकर शिंदेंच्या गोटात; आमदार वैभव नाईक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 7:32 PM