- अनंत जाधवसावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या केसरकर राणे यांच्यातील राजकीय संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. याला निमित्त सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणुक ठरली आहे.या निवडणुकीत शिंदे गट व भाजप यांच्यातील युतीचा नारळ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे हे गुरूवारी सावंतवाडीत फोडणार असून,तब्बल बारा वर्षानंतर प्रथमच राणे व केसरकर हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत शिंदे गट व भाजप एकत्र आले आहेत त्यांची लढत थेट महाविकास आघाडी बरोबर असणार आहे.या निवडणुकीत सध्यातरी शिंदे गट व भाजप यांची बाजू वरचढ असली तरी महाविकास आघाडी काहि कमी नाही.पण युतीच्या निमित्ताने मात्र शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर व भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र येणार असल्याने हा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
2009 मध्ये काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून तत्कालीन मंत्री नारायण राणे व दीपक केसरकर एकाच व्यासपीठावर आले होते.त्यानंतर राणे यांच्या सहकार्यातूनच केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघातून आमदार ही झाले होते.पण अवघ्या दोन ते अडीच वर्षांतच केसरकर व राणे याच्यात टोकाचे वाद झाले.त्यानंतर आलेल्या 2013 -14 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे खासदार कि चे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार न करता अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेच्या उमेदवारास साथ देत निवडून आणले होते.तेव्हाचा केसरकर व राणे याच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने जवळून बघितला होता.त्यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा कधीच एकत्र येणार नाही असेच सिंधुदुर्ग वासियाना वाटत होते.पण राजकारणात उद्या काय घडेल हे सांगता येत नाही तसेच सध्या राज्याच्या राजकारणात घडत आहे. ऐकामेकाचे कट्टर विरोधक ही आता एकाच व्यासपीठावर येत आहेत.तसेच राजकारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडत आहे.
ऐकेकाळचे कट्टर विरोधक राणे व केसरकर हे सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.महाराष्ट्र सत्तांतर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारातील निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच शिंदे गट व भाजप याच्यात युती झाली असून या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडीतील पाटेकर मंदिरात श्रीफळ वाढवून होणार आहे.
त्यानंतर हे दोन्ही नेते तेथेच पत्रकार परिषद घेणार आहेत.या युती च्या शुभारंभाच्या निमित्ताने राणे व केसरकर यांच्यातील मनोमिलनाचा शुभारंभ होणार असल्याने सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.