किरकोळ आरोप प्रत्यारोप वगळता शांततेत पार पडलेल्या आणि स्थानिक पातळीवरील सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली. एकूण 17 जागांसाठी झालेल्या मतदानात 11 जागा जिंकून स्वाभिमान-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजपा-शिवसेना युतीला मात दिली. त्याबरोबरच अटीतटीच्या झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदेश पारकर यांना मात देत त्यांचे कणकवलीतील वर्चस्व मोडीत काढले. कणकवली नगरपंचायतीच्या निकालाचे थोडक्यात विश्लेषण करायचे झाल्यास या निकालांमुळे शिवसेना भाजपा-युतीला धक्का बसलाय, तर नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र या निकालामुळे नारायण राणेंच्या धडाकेबाज राजकारणाला उभारी मिळणार का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खरंतर नारायण राणेंनी स्वतःचाच पक्ष सोडत भाजपाकडून खासदारकी मिळवल्यानंतरही त्यांचा पक्ष भाजपाविरोधात कणकवलीच्या निवडणुकीत उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच काँग्रेस सोडल्यानंतर राणेंच्या पुढील वाटचालीबाबत निर्माण झालेला गोंधळ आणि भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेण्यास केलेली चालढकल यामुळे आता राणेंचे राजकारण संपले, अशी हाकाटी काही जणांनी सुरू केली होती. त्यामुळे पक्षाची दाखवून देण्याचे आव्हान नारायण राणेंसमोर होते. हे आव्हान स्वतः राणे, त्यांचे दोन्ही पुत्र आणि स्वाभिमानच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लीलया पेलले. एकेकाळी कोकणात एकहाती वर्चस्व राखणाऱ्या राणेंची गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्गातील बालेकिल्ल्यातच कमालीची पिछेहाट झाली आहे. नाही म्हणायला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राणे समर्थकांनी लक्षणीय यश मिळवले होते. पण काँग्रेस सोडून वेगळा पक्ष काढत स्वतःची स्वतंत्र वाटचाल सुरू केल्यापासून राणेंच्या नेतृत्वाची खरी लढाई सुरू झाली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक जिंकली तरी राणेंसमोर खरे आव्हान असेल ते 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याचे. पुढच्या वर्षी सिंधुदुर्गातील तिन्ही आमदार आणि आणि एक खासदार हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असेल अशी गर्जना राणेंनी कणकवलीतील विजयानंतर केली आहे. पण राणेंसाठी ही गोष्ट तितकीशी सोपी नाही. एकीकडे बदलत्या राजकीय परिस्थितीत अपरिहार्यता म्हणून भाजपाने शिवसेनेशी जुळवून घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास शिवसेना सिंधुदुर्गातील आपल्या ताब्यातील एकही मतदारसंघ सोडण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत लोकससभेचा रत्नागिरी-सिंधुदुर्गं मतदारसंघ आणि सावंडवाडी-वेंगुर्ला व कुडाळ-मालवण हे विधानसभा मतदारसंघ सेनेसाठी सोडून कणकवली-देवगड हा मतदारसंघ राणेंच्या स्वाभिमान पक्षाला देणे भाजपाच्या हातात असेल. त्यातही राणेंशी हाडवैर असल्याने शिवसेना स्वाभिमानला पाठिंबा देणार नाहीच. पण सेना-भाजपा युती झाली नाही तर मात्र भाजपाशी आघाडी करून आपल्या मर्जीतील उमेदरवार उतरवण्याची संधी राणेंना मिळू शकते. पण कणकवली-देवगड मतदार संघाचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी राणेंना मोठा संघर्ष करावा लागू शकतो. पण नुकत्याच झालेल्या पिंगुळी पंचायत समिती पोटनिवडणूक आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सेना-भाजपा युतीला धूळ चारल्याने पक्षामध्ये नवा विश्वास जागा झाला आहे. त्याचा फायदा राणे आणि त्यांच्या पक्षाला नक्कीच होईल.
कणकवलीतील विजयाने मिळणार राणेंच्या राजकारणाला उभारी ?
By balkrishna.parab | Published: April 13, 2018 9:38 AM