सावंतवाडी : सावंतवाडी परिसराला शनिवारी पहाटे मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने तडाखा दिला. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहे. या वादळाचा तडाखा सर्वाधिक वीज विभागाला बसला असून, वितरण विभागाचेच मोठे नुकसान झाले आहे. तर माठेवाडा येथे कोसळलेल्या झाडा खाली कार लावण्यात आली होती. मात्र ती थोडक्यात बचावली. मुंबई-गोवा महामार्गावरील पोलिस निरिक्षकांच्या बंगल्याच्या आवारातील झाड कोसळल्याने तब्बल दोन तास वाहातूक ठप्प झाली होती. सावंतवाडीत शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाउस कोसळला तर शनिवारी मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा सावंतवाडी परिसराला दिला. तब्बल दोन ते अडीच तास पाऊस कोसळत होता. तर अर्धातास वादळी वारा सुरू होता. या वादळी वाऱ्याने शहरातील विविध ठिकठिकाणी अनेक झाडे कोसळली. यामध्ये माठेवाडा भागात आत्मेश्वर मंदिरानजीक असलेले झाड कोसळले. यावेळी झाडाखाली लावलेली कार थोडक्यात बचावली. तर बराच वेळ हे झाड रस्त्यावरच होते. मात्र नंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड तोडले. तर भटवाडी व बाहेरचावाडा परिसरात ही झाडाच्या फांद्या तुटून खाली कोसळल्या तर काही ठिकाणी झाडेच रस्त्यावर कोसळून पडली होती. तर मुंबई-गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. सावंतवाडी पोलिस निरीक्षकांच्या बंगल्याच्या आवारातील हे झाड होते. या झाडाचा काही भाग विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने वीज विभागाचही मोठे नुकसान झाले आहे. सालईवाडा तसेच पोलिस लाईन, समाज मंदिर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने सावंतवाडी परिसरात लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, माजगाव येथील मुकुंद शिवराम घाडी व मदन रामा कावले यांच्या घरावर झाड पडले यात दोन्ही घरांचे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका माडखोल धवडकी या गावाना बसला आहे. (प्रतिनिधी)
सावंतवाडी परिसरात वादळी पाऊस
By admin | Published: June 19, 2016 12:44 AM