सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजलची कामे पूर्ण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेला ५ कोटी रूपये तत्काळ वर्ग करा, असे आदेश शासनाने सिंधुदुर्गच्या ग्रामीण विभागाला दिले आहेत. या मुद्यावरून सभागृहात वादळी चर्चा झाली. एकही पैसा ‘त्या’ जिल्हा परिषदेला वर्ग करू नये, असा ठराव मंगळवारच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, महिला व बालविकास सभापती स्रेहलता चोरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सदस्य सतीश सावंत, मधुसुदन बांदिवडेकर, अॅड. रेवती राणे, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, पुष्पा नेरूरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय पेयजलची कामे पूर्ण करण्यासाठी १० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ कोटी ४२ लाख ३५ हजार रूपये १५ वाड्यांच्या पेयजलच्या कामावर खर्च करण्यात आला आहे. तर अजून या योजनेवर सुमारे साडेसहा कोटी खर्च होणे बाकी आहे. त्यामुळे शासनाने अखर्चित राहिलेली रक्कम पाहता यातील ५ कोटी रूपये रायगड जिल्हा परिषदेला वर्ग करा, असे आदेश सिंधुदुर्ग ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. हा आदेश प्राप्त होऊन आठ दिवस झाले तरी याबाबत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना कल्पना न दिल्याने अध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. तरी ‘त्या’ जिल्हा परिषदेला एकही पैसा वर्ग करू नये, असा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.राष्ट्रीय पेयजलअंतर्गत सन २०१०-११ पासून तब्बल ८६ कामे कुडाळ तालुक्यात पेंडीग आहेत. तर काही ठिकाणी विहिरींची कामे झाली आहेत. तेथे ठेकेदारांची बिले काढण्यात आलेली नाहीत. यामागे कोणत्या शाखा अभियंत्याचा समावेश आहे याची सविस्तर माहिती मिळावी, अशी सूचना सतीश सावंत यांनी करत आक्रमक रूप धारण केले. शाखा अभियंत्याकडून आपल्या ‘फायद्या’च्या कामाची फाईल हलवली जाते. असा आरोप करताना यामुळे ठेकेदारांची कामे रखडत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तळेरे-विजयदुर्ग मार्गाचे काम निकृष्टदेवगड ते नांदगाव या राज्य मार्गावरील खड्डे भरण्याचे काम चांगल्याप्रकारे केले जात आहे. त्याचप्रमाणे तळेरे ते विजयदुर्ग याही राज्यमार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, मात्र या मार्गावरील खड्डे भरताना खड्ड्यातील माती न काढता त्यात डांबर ओतले जात आहे. त्यामुळे त्या मार्गावर पुन्हा खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये-जा करततात. मात्र, या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशी माहिती बांधकाम सभापती संजय बोंबडी यांनी देत सभागृहात नाराजी व्यक्त केली.काम थांबवा, पंचयादी घालाआरटीओ चेकपोस्ट इन्सुली येथे टेलिफोनची केबल टाकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची खोदाई केली जात आहे. जिल्हा परिषदेला याबाबत कोणतीही कल्पना न देता रस्त्याची नासधूस केली जात आहे, असा मुद्दा सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी उपस्थित केला. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी संबंधित ठिकाणी जाऊन काम थांबवा व पंचयादी घाला, असे आदेश प्रशासनाला दिले.
‘पेयजल’वरून वादळी चचा
By admin | Published: December 02, 2014 11:01 PM