कुडाळ : हत्तीने घावनळे येथील मनुष्यवस्तीत घुसून, कामासाठी बाहेर पडलेल्या महिलेला सोंडेत धरून जमिनीवर आदळले. विजया विजय जाधव (वय ३५) असे तिचे नाव असून, गंभीर जखमी झाल्याने तिला गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बेसावध असलेला वनविभाग खडबडून जागा झाला आहे. हत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. घावनळे आंबेडकरनगर येथील परिसरात आज, बुधवारी पहाटे हत्ती दाखल झाला. याबाबत ग्रामस्थांना कोणतीच जाणीव नव्हती. तेथीलच विजया जाधव ही महिला घावनळे येथील कॅश्यू फॅक्टरीमध्ये कामाला जाते. रोजच्याप्रमाणे आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ती कामावर जाण्यासाठी बाहेर पडली होती; परंतु घरापासून अवघ्या १० ते १५ फुटांच्या अंतरावरील झाडीत असलेल्या हत्तीने तिला सोंडेत धरून उचलून जमिनीवर आपटले. तिने आरडाओरड केल्याने जमा झालेल्या ग्रामस्थांनी हत्तीला हुसकावून लावले. या घटनेत विजया जाधव ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तिला तत्काळ ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु अत्यवस्थ झाल्याने गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात हत्तींनी दोघांचा जीव घेतला असून, आता महिलेवरही जीवघेणा हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) वनविभाग बेसावध गेल्या महिन्यात हत्तींनी दोघांचा बळी घेतल्यानंतर वनविभागाने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी मोठी मोहीम हाती घेतली होती; परंतु त्यानंतर कोणतीही सावधानी अथवा सतर्कता बाळगण्यात आली नाही. त्यामुळे बेसावध झालेला वनविभाग या घटनेने खडबडून जागा झाला असून, घटनेनंतर जखमी विजया जाधव यांची वनविभागाच्या अधिकार्यांनी भेट घेतली.
हत्तीने सोंडेत धरून महिलेला आपटले
By admin | Published: June 05, 2014 12:31 AM