ओरोस : जिल्हा रूग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ असतानाही प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नाकारून दुसऱ्या रूग्णालयात पाठविण्याच्या (रेफर) घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या या कार्यप्रणालीने काही दिवसांपूर्वीच दोन अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी आणखी एका महिलेला रेफर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गावराई येथील एका महिलेला रविवारी पहाटे प्रसूतीसाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. मात्र त्यावेळी प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तिला रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला. आरोग्य सेवकांनी चांगली सेवा देत तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर तिला सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दाखल केल्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. महिलेची प्रसूती शासकीय रूग्णालयातच झाली असली तरी जिल्हा रूग्णालयाच्या रूग्ण सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रेफर करण्यात आल्याने दोन अर्भकांचा मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद सदस्या वंदना किनळेकर यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक बैठकांमधून याबाबत आवाज उठविला होता. शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक एस. व्ही. कुलकर्णी यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी माहिती घेऊन उत्तर देतो असे सांगितले होते. त्यानंतरही रविवारी पुन्हा तोच प्रकार घडला. गावराई येथील ज्या गावडे कुटुंबियांच्या महिलेला रेफर करण्यात आल, त्या कुटुंबात तब्बल तीस वर्षानंतर झालेले हे पहिले अपत्य आहे. जिल्हा रूग्णालयात पुुरेशी यंत्रणा उपलब्ध असतानाही येथील कार्यपद्धतीबाबत अनेकांनी या पूर्वी आक्षेप घेतले होते. तीन महिने उपचारासाठी गोव्याहून येथे आलेल्या एका रूग्णाने जिल्हा रूग्णालयातील कारभाराबद्दल खासदार विनायक राऊत यांना पत्र लिहीले होेते. त्यानंतर तरी रूग्णालयाच्या कार्यपद्धतीत बदल होण्याची अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. (वार्ताहर)
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला नाकारले
By admin | Published: August 03, 2016 12:56 AM