कणकवली : कणकवली तालुक्यात मुंबई -गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एक जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बबली राणे यांना महामार्गावर ओसरगाव येथे एक मृतदेह जळताना दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
रात्रीच या ठिकाणची फॉरेन्सिक तपासणी टीम दाखल झाली होती. ही महिला नेमकी कोण? तिचा घातपात की आत्महत्या? या महिलेचा घातपात करत तिला ओसरगाव मध्ये टाकले की कसे? तसेच या महिलेला या ठिकाणी टाकण्यामागची नेमकी कारणे काय? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत कणकवली पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.