सिंधुदुर्गनगरी : महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्यामुळे महिलांना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी व अत्याचारप्रसंगी त्यांना धीर देण्यासाठी जिल्ह्यात समुपदेशन केंद्रांची स्थापना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात येत असून २९ जून रोजी सावंतवाडी पोलीस स्थानकात तर येत्या दोन महिन्यात मालवण पोलीस स्थानकात या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बऱ्याचशा महिलांना कुटुंबात मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. या महिला काही कारणास्तव पोलीस स्थानकात तक्रार न देता त्रास सहन करत राहतात. मात्र त्रास असहाय्य झाल्यावर आत्महत्येसारखा मार्ग पत्करतात. अशा दुर्दैवी घटनांपासून महिलांना वाचविण्यासाठी तसेच गैरसमजातून महिलांना त्रास देणाऱ्या कुटुंबियांना समज देण्यासाठी महिला समुपदेशन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाची जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली येथे समुपदेशन केंद्रे असून या केंद्रातून समुपदेशन करण्याचे काम कणकवली येथे जागृती फाऊंडेशन, सावंतवाडी येथे अटल प्रतिष्ठान तर कुडाळ येथे महिला मंडळाला देण्यात आले आहे. महिलांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी सावंतवाडी पोलीस स्थानकात २९ जून रोजी तर येत्या दोन महिन्यात मालवण पोलीस स्थानकासह जिल्ह्यातील १३ पोलीस स्थानकात टप्प्याटप्प्याने महिला समुपदेशन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
महिला समुपदेशन केंद्र स्थापन होणार
By admin | Published: June 19, 2014 12:52 AM