देवरुख : राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचा सातवा वर्धापन शनिवार, ५ डिसेंबर रोजी साजरा होणार असून, त्याच दिवशी राजू काकडेंचा स्मृतिदिन आहे. राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या महिला हा स्मृतिदिन गुरववाडी येथील वाहत्या पऱ्यावर राजू काकडे स्मृती बंधारा बांधून साजरा करणार आहेत.यंदा कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सध्या वाहात असलेल्या गुरववाडी - देवरुख शाळा या परिसरातील लोकांना या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.‘संकटात आहात, मदत हवीय? हाक मारा आम्ही सज्ज आहोत’ हे ब्रिदवाक्य घेऊन आपत्कालीन परिस्थितीत समाजाला मदत करणाऱ्या राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या महिला विभागाने अनोख्या पद्धतीने स्मृतिदिन साजरा करण्याचे ठरवले आहे. यापुढे दरवर्षी याच दिवशी ५ डिसेंबरला हा स्मृती बंधारा बांधण्याचे महिला विभागाने ठरविले आहे.राजू काकडेंचे कुटुंबिय, महिला विभागाच्या सदस्या, अॅकॅडमीचे कार्यकर्ते शनिवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गुरववाडी - देवरुख येथे हा बंधारा बांधणार आहेत. महिलांनी हा स्मृती बंधारा बांधण्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या महिला विभाग संघटक, नगरसेविका मेघा बेर्डे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पाणी अडवण्यासाठी महिलाही सरसावल्या
By admin | Published: November 30, 2015 9:48 PM