मालवण : शहरातील किनारपट्टी भागात बुधवारी व गुरुवारी रात्री अनोख्या रंगीत समुद्री लाटा निर्माण झाल्याचे दिसून आले. रंगीत समुद्री लाटांचे विश्व पाहण्यासाठी नागरिकांनी किनाºयावर एकच गर्दी केली होती.
बायोलुमीनेसन्स म्हणून ओळखल्या जाणाºया या रंगीत लाटांना स्थानिक भाषेत ‘झारो लागणे’ असे संबोधले जाते. समुद्र व खाडीच्या पाण्याच्या होणाºया घुसळणीने ही प्रक्रिया निर्माण होत असल्यानेच अशा रंगीत लाटा निर्माण होत आहेत. संकष्टीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. या हंगामात जेवढी थंडी तेवढे ऊन तसेच जेवढी भरती तेवढीच ओहोटी येत असल्याने खाडीतील शेवाळ तसेच अन्य सूक्ष्म जीवप्राणी समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने घुसळण होऊन ही प्रक्रिया निर्माण होत आहे. सध्या समुद्रातील बारा फॅदमपर्यंत ही प्रक्रिया होत असल्याचे दिसून येत आहे. थंडी व ऊन यामुळे समुद्रातील सूक्ष्म जलचरांना लकाकी प्राप्त होत असल्याने रात्रीच्यावेळी समुद्राच्या रंगीत लाटा किनाºयावर धडकताना दिसत आहेत.
बुधवारी चंद्रग्रहण होते. यावेळी काही नागरिक येथील बंदरजेटी परिसरात फेरफटका मारण्यास गेले असताना त्यांना किनाºयावर रंगीत लाटा धडकत असल्याचे दिसून आले. याची माहिती सर्वत्र पसरताच शहरातील नागरिकांनी रंगीत लाटा पाहण्यासाठी बंदरजेटी परिसरातील किनाºयाकडे धाव घेतली होती. रॉकगार्डन परिसर, चिवला वेळ, दांडी येथील किनाºयावर या रंगीत
लाटांचे दर्शन होत होते. अजब रंगीत लाटा पाहिल्यावर चंद्रग्रहणामुळेच असा प्रकार घडत असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात यासंदर्भात स्थानिक मच्छिमारांशी संपर्क साधला असता थंडीच्या मोसमात हीप्रक्रिया होत असल्याने अशा रंगीत लाटा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या रंगीत लाटांसंदर्भात सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्याच्या थंडीच्या वातावरणात ही प्रक्रिया सुरू असते. भरती-ओहोटीच्या काळात खाडीतील सूक्ष्म जीव तसेच अन्य छोटी प्रवाळे समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने ही प्रक्रिया होत आहे. या प्रक्रियेला बायोलुमीनेसन्स म्हणून ओळखले जाते. समुद्रातील सूक्ष्म जीवांमुळेच समुद्री लाटा रंगीत दिसून येतात. या हंगामात किनारपट्टी भागात अशा रंगीत लाटा निर्माण होत आहेत. आकर्षक अशा या रंगीत लाटा पाहण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळाली आहे.
मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांच्याशी संपर्क साधला असता सध्या किनारपट्टी भागात रात्री ज्या रंगीत लाटा किनाºयावर धडकत आहेत त्यांना स्थानिक भाषेत झारो लागणे असे म्हटले जाते. खाडी व समुद्रातील पाणी यांच्यात घुसळणीची प्रक्रिया होत असल्याने खाडीतून येणारे सूक्ष्म जीव व शेवाळ यामुळे रंगीत लाटा निर्माण होत आहेत. सध्या बारा फॅदमच्या अंतरापर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले.संकष्टीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणारभरती व ओहोटीच्या काळात खाडीपात्रातील शेवाळ तसेच अन्य सूक्ष्म जीव समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने, तसेच जेवढी थंडी तेवढेच ऊन लागत असल्याने या सूक्ष्म जीवांना झळाळी प्राप्त होत आहे. यात समुद्राच्या पाण्यास एवढी लकाकी प्राप्त होते की समुद्रातील मासळीला मच्छिमारांनी टाकलेले जाळेही दिसून येते. त्यामुळे मासळी जाळी टाकलेल्या भागात फिरकतही नाही. यामुळे सध्या गिलनेट पद्धतीने होणारी मासेमारी पूर्णत: बंद असल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. येत्या संकष्टीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याने या काळात दररोज रात्री समुद्राच्या रंगीत लाटा किनाºयावर दिसून येणार आहेत.