रजत सावंतसावंतवाडी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने टाळेबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याची झळ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळणी व्यावसायिकांना बसली असून, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. सावंतवाडीतील चितारआळी येथील लाकडी खेळणी बनवणाऱ्या व्यावसायिकांना कुटुंब चालवायचे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमचाही साकल्याने विचार करून आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा येथील व्यावसायिक करीत आहेत.शहरातील संस्थान काळापासून सुरू असलेल्या चितारआळी येथील लाकडी खेळण्यांची बाजारपेठ सर्व परिचित आहे. महाराष्ट्र, गोव्यासह परदेशातून पर्यटक लाकडी खेळणी खरेदीसाठी शहरात येतात. मात्र, कोरोना महामारीमुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केले. याचा परिणाम पर्यटनावर मोठ्या प्रमाणात झाला.पर्यटन मंदावल्याने पर्यटनावर उपजीविका करणारे व्यावसाय मेटाकुटीस आले आहेत. ऐन पर्यटनाच्या हंगामात कोरोनामुळे सरकारने लावलेल्या टाळेबंदीमुळे लाकडी खेळण्यांची बाजारपेठ ओस पडली आहे. त्यामुळे आता व्यावसायिकांसमोर बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
व्यवसायासाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे? लाकडी खेळणी बनविणारे कारागीर, दुकानात काम करणारे कामगार यांच्या पगारासह दुकानाचे भाडे कसे? द्यायचे, कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा, या चिंतेत व्यावसायिक आहेत.गेल्या वर्षीपासून पर्यटन मंदावल्याने कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी या व्यवसायिकांकडून होत आहे.सुबक अशी लाकडी खेळणी गोडावूनमध्ये धूळखात पडली आहेत. गोवा तसेच इतर पर्यटनस्थळे फिरायला गेल्यानंतर पर्यटक सावंतवाडीतील या लाकडी खेळण्यांच्या बाजाराला आवर्जून भेट देत खरेदी करत असत. यामुळे व्यासायिकांची आर्थिक उलाढाल होत असे. पर्यटन ठप्प असल्याने परिसर सुनासुना बनला आहे.
ऐन हंगामत लॉकडाऊन जाहीर झाल्याने आम्हांला व्यवसाय बंद करावा लागला. आर्थिक उलाढाल होत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कामगारांना १५ दिवसांचे वेतन देत आहोत. लाकडी खेळणी व्यावसायिकांची कोणतीही संघटना नसल्याने आमचे प्रश्न सरकार दरबारी पोचण्यास अडचण येत आहे. सरकारने इतर व्यवसायांप्रमाणे आम्हालाही आर्थिक मदत करावी.- दयानंद सदाशिव धुरी,लाकडी खेळणी व्यावसायिक