प्रसन्न राणे - सावंतवाडी -येथील तहसीलदार कार्यालय गेली अडीच वर्षे खाजगी जागेतील फक्त तीन खोल्यांत चालत असून कर्मचारी व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे बांधकामही निधी अभावी रखडले असल्याने कर्मचाऱ्यांच्याही समस्या वाढतच चालल्या आहेत. याकडे शासन प्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची सालईवाडा येथील जुनी इमारत मोडकळीस आल्याने ही इमारत अडीच वर्षांपूर्वी पाडण्यात आली. तत्पूर्वी तहसीलदार कार्यालय राजवाडा येथे खासगी जागेत स्थलांतरीत करण्यात आले. त्यावेळी सालईवाडा येथील नवीन इमारतील शासनाने मंजुरी देवून एक कोटी निधीही उपलब्ध करून दिला व इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात आले. मात्र, अडीच वर्ष उलटून गेले, तरी इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. इकडे राजवाडा येथील खाजगी जागेत कामकाज सुरू झाले. येथे फक्त एक हॉल, तहसीलदार व तलाठ्याना एक- एक खोली आहेत. हॉलमध्ये साधारण १८ टेबल-खुर्च्या आहेत. अशा स्थितीत या तहसीलदार कार्यालयातील १०० कर्मचारी काम करत आहेत. दररोज शेकडो नागरिक विविध दाखल्यांसाठी या कार्यालयास भेट देत असतात. आता शाळेचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध दाखल्यांसाठी गर्दी वाढतच आहे. येथील बाथरूम व शौचालयाची पडकी अवस्था आहे. अशा या गैरसोयीमुळे तहसीलदार कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकाम तत्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे. इमारतीचे बांधकाम निधीअभावी रखडल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी याकडे लक्ष वेधून शासन स्तरावरून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. दोन कोटींची गरज तहसीलदार कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तीन कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली, एक कोटीचा निधीही उपलब्ध करण्यात आला. या कोटीतून जुने इमारत पाडली व नवीन इमारतीचे फाउंडेशन मात्र केले आहे. यानंतरचे काम अपूर्णच राहिले आहे.शासनालाच भुर्दंड४ गेली अडीच वर्ष खाजगी जागेत तहसीलदार कार्यालयाचे कामकाज चालत असून या जागेचे भाडे महीना ३८ हजार रुपये इतके आहे. आतापर्यंत शासनाने ११ लाख ४० हजार रुपये इतके कार्यालयाचे भाडे भरले आहे.
निधीअभावी काम रखडले
By admin | Published: June 10, 2015 11:11 PM