कणकवली : पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा निधी वर्षभर प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांची कामे अर्धवट सोडली आहेत. हा निधी तातडीने प्राप्त व्हावा, असा ठराव पंचायत समिती सभेत घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. कणकवली पंचायत समिती सभा कॉँग्रेसचे आंदोलन असल्याने पंधरा मिनिटांत आटोपती घेण्यात आली. पंचायत समितीची मासिक सभा सभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी प.पू.भालचंद महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती भिवा वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर उपस्थित होते. सभेत थोड्या विषयांवर धावती चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या नव्या सात योजनांचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान ग्रामसडकच्या कामांना वर्षभरापूर्वी मंजुरी मिळाली. परंतु कोट्यवधी रूपयांची कामे असून सुमारे २४ लाखांचा निधी आतापर्यंत प्राप्त झाला आहे. तालुक्यात सहा रस्त्यांची कामे असून निधीअभावी कामे थांबली असल्याचे सदस्यांनी सांगितले. राज्यमार्गावर उभारण्यात आलेल्या निवारा शेडस् या रस्त्यापासून फार लांब अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. त्या रस्त्यापासून जवळ उभारल्या जाव्यात. यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून तोडगा काढला जावा, असा ठराव घेण्यात आला.तालुक्यात मागच्या वर्षी १२५० कच्चे बंधारे बांधण्यात आले होते. यावर्षी २ हजार बंधाऱ्यांचे उद्दीष्ट असून आतापर्यंत ३५२ बंधारे बांधण्यात आले आहेत. उर्वरित बंधाऱ्यांसाठी शिक्षक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आदींची मदत घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पीक संरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित झाला. कृषी विभागाकडे सध्या फवारणी पंप उपलब्ध नसून ते खरेदी करण्याबाबत ठराव घेण्यात आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सभेदरम्यान करण्यात आला. (प्रतिनिधी)विशेष घटक योजना : लाभार्थ्यास ५0 हजार अनुदान४विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीयांना वॉटरपंप, बैलजोडी आदी कृषीविषयक साहित्य दिले जाणार आहे. त्यासाठी प्रतिलाभार्थी ५० हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. तालुक्यातून ३३ लाभार्थी निवडण्यात आले आहेत.
निधीअभावी कामे अर्धवट
By admin | Published: November 06, 2015 11:08 PM