लोकमत न्यूज नेटवर्कवेंगुर्ले : सध्या सुरूअसलेले सागरी महामार्गाचे काम दर्जाहीन व बोगस आहे. आमदार वैभव नाईक यांच्या नातेवाइकांच्या नावे ही कंपनी आहे. जिल्ह्यात बरीच कामे ही कंपनी करीत असून, बहुतांशी कामामध्ये बोगसपणा आहे. डांबर कणकवलीतून आणण्यात येते. शंभर ते दीडशे किलोमीटर येईपर्यंत दर्जा पण योग्य राहत नाही. त्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. ते वेंगुर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी रस्त्याचे नमुनेही तपासणीसाठी गोवा येथे पाठविणार असल्याचे सांगितले.यावेळी युवक काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष आनंद शिरवलकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी युवक जिल्हाध्यक्ष सनी कुडाळकर, सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सावंतवाडी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आदी उपस्थित होते.यावेळी माजी खासदार राणे म्हणाले, तारकर्ली पुलापासून चिपी, परुळा, म्हापणमार्गे वेंगुर्ले तालुक्यातून जाणाऱ्या सागरी महामार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम डी. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू आहे. काम ठिकठिकाणी बोगस पद्धतीने सुरू आहे. ही कंपनी कोणालाही विश्वासात न घेता आपले काम करीत आहे. या निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे वेळीच लक्ष न दिल्यास शासनाचे करोडो रुपये पाण्यात जाणार आहेत. याबाबत या भागातील अनेक ग्रामस्थांनी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यामुळे आपण आज सावंतवाडीतून वेंगुर्लेमार्गे परुळे चिपीपर्यंत दौरा करून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाची माहिती घेतली. रस्त्याचे काम शहरातील साध्या रस्त्याप्रमाणे सुरू आहे. कोठेही रस्त्याला लेव्हल नसून कामासाठी वापरण्यात येणारे साहित्यही दर्जेदार दिसत नाही. रस्त्याची बाजूपट्टी तयार करताना वापरण्यात आलेली बारीक काळी खडी ही पहिल्याच पावसात वाहून जाणारी आहे. दरम्यान, आपण या रस्त्याच्या दोन-तीन भागातील डांबरीकरणाचे नमुने तपासले. ते सर्व ठिकाणी बोगस आढळून आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पाटील यांनीही हे काम काही ठिकाणचे निकृष्ट दर्जाचे असल्याचे मान्य केले. एका ठिकाणी तर रस्त्यावर कुदळीने दोन इंच खड्डा खणला असता खाली लाल माती बाहेर आली. यावरून काम किती हलक्या दर्जाचे सुरू आहे हे दिसून येते. रस्त्याच्या कामाबाबत माहिती देताना अभियंता पाटील म्हणाले, साडेअठरा टक्के बिलाने हे काम डी. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. ७ जानेवारीला कामाची वर्कआॅर्डर मिळाली असून, ६ जुलै २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. सध्या बी.एम. पद्धतीचे काम सुरू आहे. एकूण २१ किलोमीटर रस्त्यावर तीन ठिकाणी छोटे पूल आहेत. त्यांच्या पर्यायी मार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ते झाल्यावर ती कामे हाती घेण्यात आली आहेत. एकूण ४७ किलोमीटरचा गटार खुदाईचे काम आहे. ती खुदाई कुठून सुरू झाली, असा प्रतिप्रश्न त्याला नीलेश राणे यांनी विचारला असता बाजूपट्टीचे काम झाल्यावर हे काम हाती घेऊ, असे त्यांनी सांगितले. मात्र, एकूणच सुरू असलेल्या या सागरी महामार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाबाबत नीलेश राणे यांनी नापसंती व्यक्त केली.लोकांच्या तक्रारीमुळे मी आज या सागरी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. शासनाचा एकही रुपया निकृष्ट कामामुळे वाया जाऊ नये हा आमचा उद्देश आहे. अधिकारी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. अधिकाऱ्यांना जर कोणाच्या दबावाखाली काम करावे लागत असेल, तर त्यांनी आम्हाला सांगावे. पण कोणाच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने काम करू नये. या संपूर्ण रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम उपअभियंता पाटील तुमचे आहे. जर तुम्ही आपले काम व्यवस्थित करत नसाल, तर तुमच्यावर कारवाईची मागणी आम्हाला करावी लागेल. यावेळी कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, विभागीय काँग्रेस अध्यक्ष प्रकाश राणे तसेच परुळे चिपी गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत काम दर्जाहीन होत असल्याची तक्रार राणे यांच्यासमोर मांडली. साईडपट्टीचे काम करताना पाणी मारले जात नाही. बाजूपट्टी करताना काळ्या दगडाचा वापर होत नाही. रस्त्याला लेव्हल नाही, डांबराचे प्रमाण व्यवस्थित नसते आदी तक्रारी केल्या. यावेळी बोलताना नीलेश राणे म्हणाले, आम्ही आता या कामाकडे लक्ष दिले आहे. जर अधिकाऱ्यांनी यापुढे कामाच्या दर्जाकडे लक्ष न दिल्यास आम्हाला प्रत्येक महिन्याला या रस्त्याची पाहणी करावी लागेल. ती वेळ अधिकाऱ्यांनी आणू नये. कारण तुम्ही शासनाचे सेवक आहात. चुकीचे काम होऊ देऊ नका, असा सल्ला राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्याचवेळी जर तरीही या रस्त्याच्या कामात कुठे गोलमाल दिसत असेल, तर काम बंद पाडून आंदोलन करा, असे आवाहन राणे यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी वेंगुर्ले शहर युवक अध्यक्ष भूषण सारंग, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, प्रकाश राणे, भूषण आंगचेकर, राहुल गावडे, सागर राणे, सत्यवान बांदेकर, पप्पू चिचकर, साई म्हाळदळकर, राकेश नेमळेकर, पिंगारे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काम परूळेत आणि डांबर कणकवलीहूनएरवी बांधकाम विभागाचे अधिकारी नियमावर बोट ठेवून प्रत्येक ठेकेदाराला डांबर प्लॅटजवळ पाहिजे, डांबर प्लँट असेल तरच ठेका मिळेल, अशा वेगवेगळ्या अटी घालत असतात. मग आता या सागरी महामार्गाचे काम परूळे चिपी येथे सुरू आहे आणि सत्तर किलोमीटरच्या आत डांबर प्लँट पाहिजे. मग कणकवलीवरून डांबर कसे काय आणले जाते, त्याची लेव्हल कशी राहणार, असा सवालही यावेळी माजी खासदार राणे यांनी केला आहे.
सागरी महामार्गाचे काम दर्जाहीन
By admin | Published: May 05, 2017 11:28 PM