चिपळूण : संगमेश्वर तालुक्यासाठी केंद्र सरकारच्या ‘इफ्रा २’ या योजनेंअंतर्गत कामे करावीत अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातील विविध शाखा अभियंता कार्यालयांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील जीर्ण झालेल्या उच्चदाब व लघुदाब विद्युत लाईन व ट्रान्सफार्मरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. या सर्व प्रक्रियेत बाजी मारली ती आरवली शाखा अभियंता कार्यालयाने. जीर्ण झालेल्या विद्युत लाईन बदलण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाने परवानगी दिली आहे.तालुक्यातील आरवली शाखा कार्यालयाने वर्षाअखेर ३० कि. मी. उच्चदाब विद्युत वाहिनी बदलण्याचे व लघु विद्युत वाहिनी अंतर्गत ६५ जीर्ण झालेले पोल बदलण्याचे लक्षही पूर्ण केले आहे. तसेच पाच नवीन ट्रान्सफॉर्मरही बदलले आहेत. आणखी जीर्ण झालेल्या ४ कि. मी. विद्युत वाहिनीचे काम प्रस्तावित असून, वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. पूर्ण करण्यात आलेल्या उच्चदाब वाहिनीचे काम भारत विकास व कंपनीकडे देण्यात आले आहे, तर लघुदाब वाहिनी पोल बदलण्याचे काम चिपळूण येथील प्रकाश इलेक्ट्रिकल कंपनी यांच्याकडे देण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कुंभारखाणी व कुचांबे या मार्गावरील ११ केव्हीएची उच्चदाब विद्युत वाहिनी ही जुनी असल्याने या मार्गावरील कामाला महावितरणने प्राधान्य देत विद्युत वाहिनी बदलाच्या कामाला सुरुवात केली. या मार्गावरील एकूण १५ कि. मी. अंतरातील जीर्ण झालेले सर्व लोखंडी पोल बदलून त्या ठिकाणी नवीन सिमेंट पोल व नवीन वाहिनी टाकण्यात आली आहे. उच्चदाब वाहिनीचे काम हे कुंभारखाणीपर्यंत पूर्ण झाले असून, पुढील ४ कि. मी.चे कामही प्रगतीपथावर आहे. महावितरणने उच्चदाब वाहिनी बदलाबरोबरच लघुदाब वाहिनीला ही प्राधान्य दिले आहे. ग्रामीण जनतेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक असणाऱ्या लघुदाब विद्युत वाहिन्या बदलण्याचे काम सुरु केले आहे. रातांबी येथील २ कि. मी.चे काम सध्या सुरु आहे तर बुरंबाड आंबेश्वर मंदिर येथील १.२ कि. मी. वाहिनीचे काम पूर्णत्वास गेले आहे. कुंभारखाणी येथील १ कि. मी.च्या लघुदाब वाहिनीचे कामही पूर्ण झाले आहे. आरवली येथील विजेची वाढती गरज लक्षात घेता पूर्वी असलेला ६० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या ठिकाणी १०० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. आरवलीप्रमाणे कोंडीवरे व बुरंबाड येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या दोन्ही ठिकाणी ६० केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले होते. मात्र, आता याठिकाणी १०० केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत. आरवली बाटेवाडीत नवीन ट्रान्सफार्मर बसवावा अशी अनेक दिवसांची मागणी होती. येथील ग्रामस्थांच्या मागणीची महावितरणने दखल घेतली असून, १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर याठिकाणी बसवण्यात आला आहे. या कामामुळे परिसरातील वीज गायब होण्याचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात होणार त्रासही कमी होणार आहे. (प्रतिनिधी)तहसीलदारांची गावभेट : नवीन विद्युत वाहिनीचा मुद्दाकुटगिरी येडगेवाडी येथे गेल्यावर्षी झालेल्या तहसीलदार यांच्या गावभेट कार्यक्रमात प्रामुख्याने रातांबी येथील नवीन विद्युत वाहिनीबाबतचा मुद्दा मांडला होता. या गावभेट कार्यक्रमात महावितरणचे आरवली शाखा अभियंता प्रकाश आखाडे हे उपस्थित होते. ग्रामस्थांनी मुद्दा मांडल्यानंतर याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून पाठपुरावा करुन हे काम करुन देतो असे आश्वासन दिले होते. या गावभेट कार्यक्रमाला कुटगिरीप्रमाणे रातांबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर आरवली शाखा अभियंत्यांनी हा प्रस्ताव तयार करून तो तत्काळ सादरही केला आहे.आरवली शाखेत अधिक कामेकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अधिकाधिक कामे आरवली शाखा कार्यालयाअंतर्गत होत असल्याने शाखा अभियंत्याने समाधान व्यक्त केले व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शाखा अभियंता कार्यालय हे नेहमीच तत्पर असेल. आवश्यक असणाऱ्या विद्युत वाहिनी बदलण्यासाठी मी स्वत: आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शाखा अभियंता प्रकाश आखाडे यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
इफ्रा २ योजनेची कामे युध्दपातळीवर
By admin | Published: December 25, 2015 10:48 PM