शिरगांव : २५ वर्षे सत्ता उपभोगलेल्यांनी आपला हिशोब जनतेसमोर मांडला नाही. म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवले. तेच आता आमच्याकडे दोन वर्षांचा हिशोब मागत आहेत. देवगड तालुक्याच्या आजूबाजूला भगवे आमदार आहेत. हाच मतदारसंघ भगवा करायचा आहे, असा विरोधकांचा समाचार घेत देवगड पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवरही भगवा फडकविण्यासाठी जोमाने गावागावात कामाला लागा, असे मार्गदर्शन आमदार वैभव नाईक यांनी शिरगांव येथे शिवसैनिकांना केले. शिरगांव येथे शनिवारी शिवबंधन पंधरवड्यानिमित्त शिरगांव विभागातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार नाईक म्हणाले, गेल्या ५० वर्षात शिवसेनेने विविध समाजउपयोगी उपक्रम राबविले आहेत. सामान्य माणसाला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे काम केले. म्हणूनच सर्वसामान्य माणूस आमदार, खासदार, मंत्री होऊ शकला. जिल्ह्याचा नियोजन आराखडा १३० कोटींवर पोहोचला. ३७ कोटी आंबा, काजू नुकसान भरपाई रकमेपैकी ३४ कोटींची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. मच्छिमार व वाळू व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला. दुष्काळग्रस्तांना जेथे शासनाची मदत पोहोचली नव्हती तिथपर्यंत सर्वात प्रथम मदतीचा हात देण्याचे काम केले. त्याच्यासाठी योजना राबविल्या. सत्तेत असलो आणि नसलो तरी चुकलेल्याला चूक म्हटले. म्हणूनच जनता शिवसेनेकडे पर्याय म्हणून पहात आहे. विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचे पक्षप्रमुखांचे स्वप्न सर्वांनी एकत्र येवून साकार करूया. शिवसेनेने राणे, भुजबळांसारखे नेतेच घडविले असे नाही त्यांच्या जाण्यानंतरही नवीन नेतृत्व तयार झालीत. शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारांनी, कडव्या भगव्या रक्ताच्या माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी जोमाने शिवसेना वाढविली त्या सर्वांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते, असे सांगत आमदार नाईक यांनी विरोधकांचे नाव न घेता टीका करीत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. व्ही. बी. ऐनापुरे, प्रा. कोल्हे, तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमास आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, महिला तालुकाप्रमुख वर्षा पवार, सहसंपर्कप्रमुख विजय पेडणेकर, सत्यविजय सावंत, तालुकाप्रमुख विलास साळसकर, विभागप्रमुख विक्रांत नाईक, शाखाप्रमुख रघुनाथ साटम, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, माजी तालुकाप्रमुख लक्ष्मण तारी, प्रा. व्ही. बी. ऐनापुरे, माजी सभापती रेश्मा सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, उपसरपंच दिगंबर तावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा
By admin | Published: July 03, 2016 11:27 PM