राजापूर : थाटामाटात पार पडलेल्या सौंदळ रेल्वेस्थानकाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रिय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जानेवारीपासून कामाला सुरुवात होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र मार्च महिना सुरु झाला, तरी कामाला सुरुवात न झाल्याने पूर्व परिसरवासीयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.अनेक वर्षांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी समस्त राजापूर तालुकावासीयांची सौंदळ स्थानकाची मागणी मंजूर करताना तत्काळ निधीचीही उपलब्धी करुन दिली होती. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी या स्थानकासाठी मंजूर झाला होता. त्यानंतर गत आॅक्टोबर महिन्यात नियोजित स्थानकाचे भूमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार पडले होते. त्यावेळी सौंदळ रेल्वेस्थानकाचे काम जानेवारी महिन्यापासून सुरु होणार असल्याची घोषणा स्वत: रेल्वेमंत्र्यांनी केली होती. आता घोषणेप्रमाणे सौंदळच्या कामाला सुरवात होईल, अशी अपेक्षा असतानाच मार्च महिना सुरु झाला, तरी अजूनही नियोजित स्थानकाच्या कामाला प्रारंभ झालेला नाही. केवळ नियोजित स्थानकाच्या जागेपर्यंत विद्युत पोल उभारुन स्वतंत्र लाईन टाकण्यात आली आहे व एक - दोन गाड्या चिरा आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे सौंदळच्या कामाला समाधानकारक सुरवात झालेली नाही. राजापूर तालुक्याच्या बहुतांशी भागाला तसच लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही परिसरालाही या स्थानकाला फायदा होणार आहे. त्यामुळे या स्थानकाच्या कामाला लवकरात लवकर सुरवात होणे अपेक्षित असताना कोकण रेल्वे प्रशासनाने अजूनही कामाला सुरवात केलेली नाही.नियोजित स्थानकाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भराव करावा लागणार असून, त्यासाठी भरपूर माती लागणार आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सौंदळ गावात भरपूर माती कुठे मिळेल? त्याची पाहणी केली होती. काही स्थानिक ग्रामस्थांनी या मातीची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, याचे पुढे काय झाले ते कळू शकलेले नाही. पावसाळ्याापूर्वी सौंदळ स्थानकाच्या उभारणीचे काम सुरु होईल का? अशी विचारणा ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेले सौंदळ स्थानकाचे काम वेळेवर सुरु होईल, अशी आशा सर्वांना होती. पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.(प्रतिनिधी)प्रभू : रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी...सौंदळ स्थानकाचे काम रखडल्याने सध्या परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जानेवारीपासून कामाला सुरुवात होईल, असे सांगितले होते. मात्र, मार्च महिना सुरु झाला, तरीही हे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.कोल्हापूरला फायदाकोकण रेल्वे मार्गावर होत असलेल्या सौंदळ स्थानकाचा फायदा राजापूरबरोबरच कोल्हापुरातील लोकांनाही होणार आहे.
सौंदळ स्थानकाचे काम रखडले
By admin | Published: March 10, 2016 10:51 PM