कणकवली : सोनवडे घाटमागार्साठी संघर्ष समितीच्यावतीने ३० मे रोजी पणदूर येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. मात्र या घाटमार्गाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असल्याने हे आंदोलन थांबवावे, असे आवाहन करतानाच या घाटमार्गाच्या अंतिम मंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय वन व पर्यावरण विभागाकडे आहे. वन्यजीव संस्थेचे पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात या घाटमार्गाची पाहणी करून आपला अहवाल पर्यावरण मंत्रालयाला देणार आहे. त्यामुळे तेथे मान्यता मिळाल्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया सुरू होईल. तसेच पावसाळ्यानंतर या घाटमार्गाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होईल, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, उपतालुका प्रमुख प्रथमेश सावंत, आनंद आचरेकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, राजू राठोड आदी उपस्थित होते.खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले, सोनवडे घाटमार्ग होण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आमदार वैभव नाईक तसेच कोल्हापूर येथील आमदार प्रकाश आबिटकर यांनीही सातत्याने या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही हा प्रश्न सोडविण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे या वर्ष अखेरपर्यंत सोनवडे घाटमार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल, असा आम्हाला विश्वास आहे.या घाटमार्गाचे काम सुरू करण्यासाठी वन्य जीव संस्थेचा अहवाल महत्त्वाचा आहे. या अहवालानंतर केंद्र शासनाची मान्यता मिळून प्रत्यक्ष निविदा प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या वन्यजीव संस्थेने घाटमार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी यंत्रणेने बेफिकिरी दाखविली होती. त्यातच नियोजित घाटमार्गाच्या जागी त्यावेळी मृत जनावर आढळले होते. त्यामुळे या घाटमार्र्गाला वन्यजीव संस्थेने परवानगी नाकारली होती. आता १ ते ७ जून या कालावधीत पुन्हा डेहराडून येथील वन्यजीव संस्थेचे पथक या घाटमार्गाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणेसह आम्हीही तेथे उपस्थित राहणार आहोत.या घाटमार्गासाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया कोणतीही त्रुटी न ठेवता पूर्ण करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर येथील कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर घाटमार्गाचे काम सुरू होईल. हा प्रश्न आता निकाली निघाल्याने कोणीही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रा. महेंद्र नाटेकर आणि इतर मंडळींनी सोनवडे घाट मार्गासाठीचे 30 मे चे आंदोलन थांबवावे, असे आवाहनही खासदार राऊत यांनी यावेळी केले.ते म्हणाले, केंद्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अपंगांसाठी आरोग्य शिबिरे घेतली होती. यात ६ हजार ५०० अपंगांची तपासणी झाली. त्यातील २ हजार ६५१ पात्र अपंगांना व्हीलचेअर, कर्णयंत्रे, काठ्या, कृत्रिम हात व पाय लवकरच वितरित केले जातील. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत या कार्यक्रमाला उपस्थित रहातील. या अपंग बांधवांची कागदपत्रे पूर्ण करून त्यांनाही मोफत साहित्य वितरण करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंतच पर्ससीन मच्छिमारांना मासेमारीस मुभा आहे. मात्र, पारंपरिक मच्छिमारांच्या हिताच्या आड न येता पर्ससीन मच्छिमारांना एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यासाठी आम्ही शासनाकडे आग्रही आहोत. दुसरीकडे देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील मच्छिमारीसाठी एकच कार्यपद्धती असावी, असे धोरण आखले जात आहे. पुढीलवर्षी त्याची अंमलबजावणी होईल.वागदे आणि कुडाळ शहरातून जाणाऱ्या हायवे चुकीच्या पद्धतीने आखला होता. त्यात सुधारणा करून तो ४५ मीटरपर्यंत करण्यासाठी आग्रही भूमिका आम्ही घेतली आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले. (वार्ताहर)एलईडी बल्बमुळे विजेची बचत!सिंधुदुर्गात ८ लाख २९ हजार ७८५ एलईडी बल्बचे वितरण झाले आहे. त्यामुळे सरासरी ३५ टक्के वीज बिलात बचत झाली आहे. वाटप झालेल्या एलईडी बल्बपैकी १२ हजार खराब झाले असून ते बदलून देण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील काळात ट्यूब, फॅन आणि कृषी पंपदेखील सवलतीच्या दरात ग्राहकांना देण्याचे नियोजन आहे, असे राऊत यांनी सांगितले.
सोनवडे घाटामार्गाच्या कामाला लवकरच मान्यता मिळणार
By admin | Published: May 26, 2016 9:40 PM