कणकवली: आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०३० सालापर्यंत दरडोई उत्पन्नात आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. प्रामाणिकपणे, निष्ठेने एकत्रितपणे काम करून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला बहुमताने निवडून आणले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आतापासूनच एकदिलाने कामाला लागा असे आवाहन केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी आयोजित महायुतीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली , ऍड.अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, प्रज्ञा परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, भाजप महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर, अविनाश चमणकर,सावळाराम अणावकर, सचिन वालावलकर, मनोज रावराणे, रणजित देसाई, संतोष कानडे, रुपेश पावसकर, संदीप मेस्त्री, सुरेश गवस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.राणे म्हणाले, तीन पक्षांचा हा मेळावा आहे,लोकसभेचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण काम केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी जनतेला ५४ योजना दिल्या आहेत.८० कोटी लोकांना धान्य मोफत दिले आहे.त्यासाठी साडेतीन लाख कोटी खर्च येत आहे. आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना ,मोफत घरांची योजना,नळ पाणी योजना अशा योजनांचा लोकांना लाभ मिळतोय. लोकांमध्ये जाऊन या योजनांची माहिती सांगा. त्याची लाभार्थीना जाणीव करुन द्या. फक्त नुसती चर्चा न करता आपण काम केले पाहिजे. गरिबांना चांगले दिवस दाखवण्याचे काम भाजप करेल. आता कोणाचेच फलक लावू नका,उमेदवार ठरला की आम्हीच त्यांचे फलक लावू. राणे भाजप म्हणू नका. तर, आता फक्त भाजपाच असेल.
नरेंद्र मोदी यांच्या साथीला आपला खासदार असला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा. पुढच्या ५ वर्षात जिल्ह्याचा कायापालट होईल.१९६६ मध्ये २ रुपये भरून शिवसैनिक झालो. जे कधी जवळ पण गेले नाहीत,ते आता बाळासाहेब कसे होते हे सांगताहेत.मात्र, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका होता.तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. त्यांचा सहवास माझ्या एवढा कोणाला लाभला नाही. माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर कोणी टीका केल्यास ती आम्ही सहन करणार नाही,असेही ते म्हणाले.