कणकवली: आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास कोणताही अडथळा येणार नाही. आपण लोकांचे बांधील आहोत, तुम्हाला मदत लागल्यास मला कळवा. तातडीने उपाययोजना करु. शासनाची मदत लागत असेल तर मी तुमच्या मधील दुवा बनून सहकार्य करायला तयार आहे. संवाद ठेवा,तरच जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल.आपण जनतेचे सेवक असल्याच्या भावनेतून काम करा. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. कणकवली तहसीलदार कार्यालय येथे बुधवारी कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार, वैभववाडी तहसिलदार दीप्ती देसाई , देवगड तहसीलदार करिश्मा नायर, तालुका आरोग्य अधिकारी प्रणोती इंगवले, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, पोलिस निरीक्षक अनिल जाधव, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे ,सार्वजनिक बांधकाम उपअभियंता के.के. प्रभू, महामार्ग प्राधिकरण उपअभियंता शिवणीवार आदींसह तीन तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कणकवली मतदार संघातील जनतेला अतिवृष्टी व आपत्ती कालावधीत कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये.त्यादृष्टीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये ,त्यादृष्टीने सर्वांनी सेवा द्यावी.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा सरकारकडे समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी थेट मला संपर्क अधिकाऱ्यानी साधावा, अशा सूचना आमदार राणे यांनी यावेळी दिल्या. वैभववाडी आणि कणकवलीमध्ये साफसफाई करणे आवश्यक आहे. भुईबावडा आणि फोंडाघाट सुरळीत केला आहे. आरोग्य विभागाने काळजी घेऊन सेवा द्यायला पाहिजे. दवाखान्यात आलेल्या रुग्णांना सेवा द्यावी, अशा सूचना दिल्या. कणकवलीतील धबधब्यांचे काय? कणकवलीत महामार्ग सर्व्हिस रस्त्यावर धबधबे तयार होतात त्याचे काय केले? आठवड्यानंतर ते काम होऊन चालणार नाही.कामे वेळेतच केली पाहिजेत.अशी कानउघडणी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांची आमदार राणे यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत चुका केल्यास कारवाई प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आपत्तीच्या काळात कार्यालयीन वेळेनंतर फोन चालू ठेवावेत. आपत्ती काळात मुख्यालयात रहावे, तुमच्या अडचणी असल्यास सर्वांनी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.नैसर्गिक आपत्तीत चुका केल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे. आमदारांनी धरले धारेवर ! गगनबावडा घाट मार्गावर समस्या असल्याचे नासीर काझी यांनी बैठकीत सांगितले. त्यावर शिवणीवार यांनी कामाची निविदा प्रक्रिया झाली असल्याचे सांगितले.मात्र,नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत चुकीची उत्तरे देवू नका.जनतेला तोंड आम्हाला द्यायला लागते.तुम्ही वरिष्ठांशी बोला तातडीने काम चालू करा.असे सांगत शिवणीवार यांना धारेवर धरले.