मालवण : पोईप येथील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करणाऱ्या मनोज प्रल्हाद मोरे (३६) यांचा मृतदेह विरण- पोईप सीमेवरील नाल्यात शनिवारी सकाळी आढळून आला. याबाबत पोलिस पाटील निनाद माडये यांनी मसुरे पोलिस दूरक्षेत्राला माहिती दिली. मनोज मोरे हा तरुण दीड महिन्यापूर्वी पोईप येथील वर्दम यांच्या हॉटेलमध्ये कामाला आला होता. वर्दम यांच्या नातेवाइकांनी त्याला हॉटेलात कामाला ठेवले होते.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज मोरे हा दारू पिऊन आल्याने हॉटेलमालक तुषार वर्दम यांनी त्याला 'कामावरून जा' असे सांगितले होते. तरी शनिवारी सकाळी लवकर उठून त्याने हॉटेलातील काही पदार्थही बनविले होते. त्यानंतर हॉटेलमालक वर्दम हे आपले हॉटेल घेऊन बिळवस यात्रेला गेले. मनोज मोरे विरण परिसरातील दुकानातून काही साहित्य खरेदी करून परत येत असताना पोईप विरण सीमेवरील नाल्यात तोल जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दहा फूट नाल्यावरून पडल्याने व दारूच्या नशेत असल्याने त्यांना पाणी कमी असूनही उठता आले नाही. परिणामी, पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे.जिल्ह्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांच्याकडील आधारकार्डवरील पत्त्यामुळे त्यांच्या मुंबई येथील नातेवाइकांशी संपर्क करून त्यांना माहिती देण्यात आली. ही घटना समजताच मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, हवालदार राजन पाटील, सुहास पांचाळ, प्रमोद नाईक, शिपाई सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली; परंतु मोरे यांचे नातेवाईक उपस्थित नसल्याने पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.यावेळी पोलिस पाटील महेश परब, निनाद माडये, पंकज वर्दम, दिलीप कांदळकर, सिद्धेश माडये, रवींद्र कुशे, गोपीनाथ पालव, विजय पालव यांनी पोलिसांना सहकार्य केले.
दारूच्या नशेत नाल्यात पडला, उठता न आल्याने पाण्यात गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला; सिंधुदुर्गातील पोईप येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 3:58 PM