बांदा : दोन महिने मजुरी न मिळाल्याने कामगारांसह मुलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. बांदा-शिरोडा मार्गावर एका खासगी कंपनीच्या केबलसाठी खोदाई कामगारांचा दोन महिन्यांचा पगार संबंधित ठेकेदाराकडून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची, मुकादमाकडून अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात असल्याची तक्रारही बांदा पोलीस स्थानकात केली. ठेकेदारामुळे लोकशाहीतील महत्त्वाच्या मतदान या अधिकारापासून आम्हाला वंचित रहावे लागत असल्याची खंत संबंधित कामगारांनी व्यक्त केली.
गेले काहि महिन्यांपासून बांदा - मडुरा- शिरोडा मार्गालगत एका खासगी मोबाईल कंपनीची केबल टाकण्याचे काम सुरु आहे. मडुरा ते पाडलोस सदर कामासाठी ठेकेदाराने मुकादमाकडून विदर्भातील अकोला जिल्ह्यातील १७ मजूर आणले आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराने गेले दोन महिने कामाची मजुरी अदा न केल्याने कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
गेले पंधरा दिवस मजुरीसाठी वारंवार तगादा लावूनही टाळाटाळ केली जात असल्याने पाडलोस उपसरपंच महादेव गावडे यांच्या सोबत कामगारांनी बुधवारी सकाळी बांदा पोलीस स्टेशन येऊन आपली व्यथा मांडली. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी संबंधित ठेकेदाराशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्याने कामगारांची मुकादम एक महिला असून तिच्याकडेच सर्व मजुरी कराराप्रमाणे अदा केली असा दावा केला.
बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित ठेकेदार व महिला मुकादम यांना गुरुवारी संध्याकाळ पर्यंत बांदा पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे. सर्व कामगारांचे पैसे त्यांना मिळण्यासाठी बांदा पोलीस प्रयत्न करणार असल्याचे, जाधव यांनी सांगितले. पाडलोस केणीवाडा येथे वस्तीसाठी असलेल्या कामगारांकडून ठेकेदार रात्रंदिवस पाईपलाईन खोदाईचे काम करून घेत असे. परंतु आम्ही गाळलेल्या घामाचे, कष्टाचे पैसे देण्याची वेळ आली त्यावेळी ठेकेदार रत्नागिरी येथे जातो असे सांगून निघून गेला. मात्र पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न केला असता सदर फोन कर्नाटक येथे असल्याचे समजते. विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाला आम्ही वंचित राहणार आहोत.
परिस्थिती बिकट
गेल्या अनेक दिवसांपासून ठेकेदार पैसे आज देतो, उद्या देतो असे करून प्रत्येक दिवस घालवत असे. तसेच काम करण्यासाठी महिलांना व पुरुष कामगारांना धमकी देत असल्याचे कामगारांनी पोलिसांना सांगितले. गेले चार दिवस आम्ही अन्न पाण्यावाचून असल्याने आमची दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत चालली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
बांदा पोलीस स्थानकात व्यथा मांडण्यासाठी अकोला जिल्ह्यातील आपल्या मुलांसह कामगार आले होते.