सुधीर राणे
कणकवली : कणकवली पंचायत समिती कार्यालया मागे पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालया नजीक बचत गट माल विक्री केंद्र बांधण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकाऱ्यांसाठी तर प्रांताधिकारी कार्यालयालगत तहसिलदारांसाठी निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, या तिन्ही इमारतींच्या कामासाठी लाखो रूपये खर्च करण्यात येवूनही ती बांधकामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे आतापर्यंत खर्च करण्यात आलेले लाखो रूपये वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.कणकवली तालुक्यातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेला माल एकत्रितरित्या , एकाच छताखाली विक्री करता यावा , बचतगटांना मार्गदर्शन करता यावे , या उद्देशाने शासनाकडून तालुक्यासाठी बचतगट माल विक्री केंद्रासाठी निधी मंजूर झाला . येथील पंचायत समिती कार्यालयाच्या मागे सन २०१२ मध्ये सुमारे ४४ लाख रुपये खर्चाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले . मात्र अजूनही या इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही . शासकीय अधिकारी व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हे काम रखडले आहे.या इमारतीवर आतापर्यंत १४ लाख रुपये खर्च झाले आहेत . मात्र , ठेकेदाराने पुढील कामच न केल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. लवकरच पुन्हा अंदाजपत्रक तयार करून काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.बचत गट विक्री केंद्र उभारण्याचे काम सुरुवातीपासूनच संबंधीत ठेकेदाराने अपेक्षित असे केले नाही .
तसेच काम पुर्ण होण्याच्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरही म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्यातच काम बंद पडले आहे. त्याचबरोबर तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकाऱ्यांसाठी तर प्रांताधिकारी कार्यालयालगत तहसिलदारांसाठी निवासस्थानांचे बांधकाम सुमारे सात वर्षापूर्वी करण्यात आले आहे.या निवासस्थानासाठी तत्कालीन आराखडयानुसार प्रत्येकी सुमारे साडेबारा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून या दोन्ही निवासस्थानांची बांधकामे करण्यात आली आहेत. त्यापैकी तहसिलदारांच्या निवासस्थानाचे काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
मात्र, अजूनही ते निवासस्थान विनावापर पडून आहे. तर प्रांताधिकारी निवासस्थानाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तेहि वापरता येण्यासारखे नाही. तालुक्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचेच काम जर असे रखड़त असेल तर जनतेला सुविधा देताना काय स्थिति निर्माण होऊ शकते याचा अंदाज यावरुन निश्चितच येवू शकतो.लोकप्रतिनिधी गप्प का ?अगदी छोट्याशा विषयावरूनही येथील लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र, या शासकीय इमारतींवर लाखो रुपये खर्च होऊनही अद्याप त्याचा वापर करता येत नाही. अशावेळी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसले आहेत ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.पंचायत समिती कार्यालयाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा !कणकवली पंचायत समिती कार्यालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीतील वीज जोडणी तसेच फर्निचर अशी कामे कधी पूर्ण होणार ? तसेच या कार्यालयाचे उदघाटन होऊन जनतेला सुविधा कधी मिळणार ? या प्रतिक्षेत तालुकावासीय आहेत.