सावंतवाडी : जिल्ह्यात नारळ लागवड क्षेत्र वाढण्याबरोबरच येथील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल याकरिता नारळ विकास बोर्ड ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा श्रीफळ उत्पादक संघ यांच्यावतीने जागतिक नारळ दिन कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती नारळ विकास बोर्डाचे प्रमोद कुरियन यांनी दिली.यावेळी नारळ विकास बोर्डाचे शरद आगलावे, श्रीफळ उत्पादक संघाचे रामानंद शिरोडकर, रणजित देसाई आदी उपस्थित होते. कोकणातनारळाला पोषक वातावरण आहे. मात्र त्यादृष्टीने नारळाची लागवड होताना दिसून येत नाही.
शासनाच्या कृषी विभागाकडूनही वेगवेगळ््या योजना उपलब्ध आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीपर्यंत न झाल्याने या योजना म्हणाव्या तशा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. त्यासाठी भविष्यात कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे कुरियन यांनी सांगितले.पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, नारळ विकास बोर्डाचे राजाभाऊ लिमये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नारळ उत्पादक तसेच सावंतवाडी दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड येथील नारळ उत्पादक हितवर्धक क्लस्टरमधील लाभार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रामानंद शिरोडकर यांनी केले.नारळ लागवड क्षेत्र वाढविण्यावर भरजिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेतून केरळच्या धर्तीवर निरो प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली आहेत. मात्र त्यासाठी तत्त्वत: मान्यता अद्याप मिळाली नाही. जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने या ठिकाणच्या शेतकऱ्यांना विविध योजनांबरोबरच नारळावर येणाऱ्या रोगांचे संकट कसे दूर करता आले पाहिजे याच्या मार्गदर्शनासह नारळाला दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय येथील नारळ लागवड क्षेत्र वाढण्यावर आमचा भर राहणार आहे, असे ते म्हणाले.