मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असतानाच तालुक्यातील देवबागवासीयांना पुन्हा उधाणाचा फटका बसला आहे. महाकाय लाटांनी देवबागला तडाखा दिला आहे. देवबाग ख्रिश्चनवाडी येथील बंधारा पार करून लाटा वस्तीत घुसल्या. सात घरांमध्ये पाणी घुसले असून, किनारपट्टीनजीकच्या हॉटेल सी पर्ल आणि कॅन्टासी बीच रिसॉर्ट या हॉटेल्सना लाटांनी तडाखा दिला आहे.या सागरी अतिक्रमणाची माहिती मिळताच सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सभापती उदय परब, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य देवानंद चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी व्ही. के. जाधव यांनी देवबागला भेट देऊन पाहणी केली.गेले काही दिवस सागरी अतिक्रमणाने भयभीत झालेल्या देवबागला आज, शनिवारी पुन्हा अजस्र लाटांनी तडाखा दिला. देवबाग ख्रिश्चनवाडी आणि भाटकरवाडी येथे कमी उंचीचे संरक्षक बंधारे आहेत. त्यामुळे लाटांनी हे बंधारे पार करून वस्तीत शिरकाव केला. संतोष नेवाळकर, लक्ष्मी यशवंत कुडाळकर, मनोरमा वासुदेव धुरी, रिटा फर्नांडिस, इजाबेल फर्नांडिस यांच्या घरात पाणी घुसले. त्यामुळे या लोकांचे हजारोंचे नुकसान झाले आहे. तसेच हॉटेल सी पर्ल आणि कॅन्टासी बीच रिसॉर्टमध्येही लाटांनी शिरकाव केला. त्यामुळे रिसॉर्टमध्ये पाणीच पाणी झाले होते.नुकसानीचे पंचनामे करादेवबाग येथे सागराच्या महाकाय लाटांनी वस्तीत घुसून थैमान घातल्याने जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी महसूल प्रशासन यंत्रणेला दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत महसूल यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करण्यात मग्न होती.मालवणात सागरी अतिक्रमणमालवण दांडी भागात सागराच्या अजस्र लाटांनी थैमान घातले. मालवण दांडी भागातील अजित आचरेकर यांच्या मालकीचा मासळी सुकविण्याचा धक्का सागराच्या लाटांनी उद्ध्वस्त केला. मालवण राजकोट भागातही सागराच्या उंचच उंच लाटांनी तांडव नृत्य केले. (प्रतिनिधी)
देवबागला पुन्हा लाटांचा तडाखा
By admin | Published: June 15, 2014 12:27 AM