प्रसाद बागवे ल्ल कुणकेश्वर देवगडचा ‘हापूस’ जगप्रसिद्ध असल्याने तालुक्यात आंबा उत्पादनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावरती अवलंबून आहे. संपूर्ण निसर्गाच्या कृपेवर आधारीत असलेल्या या पिकाला यावर्षी ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन देवगड तालुक्यातील विविध भागात आंबा कलमांना मोहर येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी-बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भातपिकाच्या समाधानकारक उत्पादनाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी या हंगामाच्या यशस्वीततेसाठी कंबर कसली असून अनेक ठिकाणी आंबा बागायतदारांनी बागांच्या साफसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये यंत्रसामग्री व कीटकनाशकांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. देवगड तालुक्यात आंबा बागायतदारांमध्ये पूर्वी जास्त उत्पादनासाठी चढाओढ असायची. परंतु अलिकडील काही वर्षांमध्ये बदलत्या वातावरणामुळे, अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे तसेच औषध फवारणी आणि मजुरी यांच्या खर्चामुळे मिळणारे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमी झाले आहे. परिणामी शेतकरी आपल्या बागा करारावर देत आहेत. गेल्या काही वर्षात स्थानिक कामगार उपलब्ध होत नसल्याने बागायतदार नेपाळी कामगार उपलब्ध करत आहेत. नेपाळी कामगार संपूर्ण दिवस-रात्र बागेची राखण, बागेची देखभाल तसेच अचूक आंबा तोडणी, भरणी आदी कामांमध्ये कुशल असल्याने सर्वत्र नेपाळी कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी मोहोराबरोबर कलमांवर पालवी येण्यास सुरुवात झाली असून चांगल्या उत्पादनासाठी ही पालवी टिकवून ठेवणे तसेच तुडतुडा, थ्रीप्स, करपा आदी रोगांवर प्रतिबंधक उपाय योजन्याचे आव्हान शेतकरी-बागायतदारांसमोर आहे. एकंदरीत शेतकरी मागील वर्ष विसरून पुन्हा एकदा नव्या जोमाने आंबा कलमांच्या देखभालीमध्ये गुंतला आहे. निसर्गाची कृपा बळीराजावर होऊन आंबा पिकाचे विक्रमी उत्पादन यावर्षी यावे अशी सर्वच शेतकरी, बागायतदार प्रार्थना करत आहेत. आवश्यकतेनुसार फवारणी करा शेतकरी-बागायतदारांनी चांगल्या उत्पादनासाठी फवारणी तंत्राचे अभ्यासपूर्ण नियोजन करावे. प्रारंभिक फवारणी करताना सौम्य औषधांचा डोस वापरून आवश्यकतेनुसार औषधांची फवारणी केल्यास तुडतुडा, थ्रीप्स आदींचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल व उत्पादनात वाढ होईल. - नीलेश गुरव, प्रगतशील शेतकरी, मुणगे
यावर्षी आंबा पिकाला ‘अच्छे दिन’
By admin | Published: November 15, 2016 11:28 PM