रत्नागिरी : जगातील १७५ देश २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करणार आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे जागतिक योगादिन आठ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपकार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह अॅड. प्राची जोशी उपस्थित होत्या.आंतरराष्ट्रीय योगादिनाची पूर्वतयारी व वातावरण निर्मिती या उद्देशाने सोसायटीतील सर्व शिक्षकवृंद व निवडक विद्यार्थीवर्गाचा सराव सुरू आहे. सकाळ व सायंकाळी अशा दोन सत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांचा सराव सुरू आहे. याशिवाय रत्नागिरीतील सेंट्रल जेलमधील बंदिवानांसाठीही सोसायटीतर्फे प्रशिक्षण सुरू असल्याचे अॅड. पाटणे यांनी सांगितले.दि. २१ जून रोजी महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सकाळी ७.३० ते ८.१५ या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ध्यान, योगासने व प्राणायाम अशी प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चाणक्य मंडळ, पुणेचे संचालक अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत. योगादिनानिमित्त प्रार्थना, ओंकार, योगासनांमध्ये वृक्षासन, ताडासन, विरासन, अर्धकटी चक्रासना, त्रिकोणासन, प्राणायाममध्ये दीर्घ श्वसन, कापलभारती, भ्रामरी त्यानंतर ध्यान, योग प्रात्यक्षिके, कल्याण मंत्र आदींचे नियोजन करण्यात आले आहे. सोसायटीअंतर्गत असलेल्या शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. योगासनानंतर अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला योगाप्रेमी, आरोग्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. पाटणे यांनी केले आहे. जगातील १७५ देश आंतरराष्ट्रीय योगादिनात सहभागी होत असताना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी रत्नागिरीकरानाही येथील योगा प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन मिळणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण होत आहे. (प्रतिनिधी)
योगादिनी ८ हजार विद्यार्थी उपस्थित राहणार
By admin | Published: June 19, 2015 11:18 PM