सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यापुढे केवळ नैसर्गिक प्रसुतीच होणार आहेत, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आरोग्य समिती सभेत दिली.
भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे. या रुग्णालयांंना आवश्यक ती सर्व सुविधा पुरवून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणाऱ्या सर्व प्रसुती या यापुढे उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधे करण्यात येणार आहेत. त्यासाठी या रुग्णालयांना प्रत्येक प्रसुतीसाठी कमीत कमी चार हजार रुपये दिले जाणार आहेत.
आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शर्वाणी गांवकर, श्रेया सावंत, उन्नती धुरी, राजेश कविटकर, जेरॉन फर्नांडिस, हरी खोबरेकर, यशवंत परब, लक्ष्मण रावराणे, समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सर्व अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
यापुढे ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या प्रसुती त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात व्हाव्यात, त्यांना कित्येक किलोमीटरवर असलेल्या जिल्हा रुग्णालयापर्यंत यावे लागू नये, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील काही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे शासनाने ठरविले आहे.
यासाठी जिल्ह्यातील अशा ग्रामीण रुग्णालयांना प्रसुतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या रुग्णालयांमधे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेअंतर्गत स्थानिक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येणार असून, त्यांना भरघोस असे मानधनही देण्यात येणार आहे. या योजनेनुसार भविष्यात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणाऱ्या सर्व प्रसुती या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमधे करण्यात येणार आहेत.
...तर त्या ठेकेदाराचा ठेका काढून घ्या : प्रीतेश राऊळजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिकांवर चालक म्हणून काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेले सहा महिने मानधन नाही. त्यामुळे ते कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा विषय लवकर मार्गी लावावा, अशी मागणी सदस्यांनी केली.
यावर हा विषय आपल्यापर्यंत आला असून, या कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळावे यासाठी संबंधित ठेकेदाराशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोन उचलत नाही, अशी माहिती सभापती प्रीतेश राऊळ यांनी सभागृहात देतानाच जर हा ठेकेदार असा वागत असेल तर त्याच्याकडील चालक पुरविण्याचा ठेका काढून घ्या, अशा सूचना सभापतींनी दिल्या.
माकडतापाबाबत सर्व आवश्यक ती खबरदारी घेणार जिल्ह्यात गतवर्षी उद्भवलेल्या माकडताप (के. एफ. डी.) या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यकती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. माकडतापबाधित आणि जोखीमग्रस्त गावांमधे आतापर्यंत ४२ हजार २०१ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. तर या तापासाठी आवश्यक असलेले डी.एम.पी. तेल मागविण्यासाठी निविदा काढण्यात आली असून यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे तेल लवकरच उपलब्ध होईल.
- डॉ. योगेश साळे