चिपळूण : विधानपरिषदेसाठी जानेवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. मी विधान परिषदेचा विद्यमान आमदार आहे. माजी मंत्री नारायण राणे यांच्याकडे कोकणची जबाबदारी आहे. त्यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. परंतु, विधान परिषदेत विद्यमान आमदार असल्याने आपण पुन्हा इच्छुक आहोत. तरीही पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आपण मान्य करू, असे कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी सांगितले. एस. टी. कर्मचारी संघटनेच्या हल्लाबोल मेळाव्यासाठी आमदार जगताप चिपळूण येथे आले असता ते बोलत होते. विधानपरिषदेसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे इच्छुक आहेत, आपण विद्यमान आमदार आहात, पण राणे निवडणूक लढविणार आहेत का, याबाबत छेडले असता आमदार जगताप म्हणाले, याबाबत अद्याप मला माहिती नाही. राणे साहेबांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. मी विद्यमान आमदार असल्याने मी इच्छुक आहे. उद्या सोमवारी प्रदेश काँग्रेसची बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल. इच्छुकांची यादी केंद्रीय निवड समितीकडे जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. अजूनही कोणाच्या नावाची चर्चा झालेली नाही, असेही भाई जगताप यांनी सांगितले.विधान परिषदेच्या या जागेसाठी नारायण राणे इच्छुक आहेत, हे आपल्याला माहित नाही. पण, आपण पक्षाकडे उमेदवारी मागू. अखेर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे आमदार जागताप यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप माटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, नगरसेवक लियाकत शाह, अशोक जाधव, फैसल पिलपिले, कैसर देसाई, सेनेचे प्रताप साळवी, नगर परिषदेचे गटनेते राजू देवळेकर, युवा सेना तालुका अधिकारी संदेश आयरे आदींनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
विधानपरिषदेसाठी आपण इच्छुक
By admin | Published: November 30, 2015 12:26 AM