सिंधुदुर्गनगरी : सरकारी कामात अडथळा करून कानफटात मारल्याप्रकरणी संदेश मधुकर चव्हाण (वय ३४, रा. वायरी, ता. मालवण) याला मालवण न्यायालयाने दिलेली तीन महिने सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुनिल कोतवाल यांनी अपिलात कायम केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मालवण तलाठी कार्यालयात हरिश्चंद्र भगवान देऊलकर हे कोतवाल या पदावर कार्यरत होते. देऊलकर हे करवसुलीची यादी घेऊन कर वसुलीसाठी शिवराम अर्जुन चव्हाण यांच्या घरी गेले होते. यावेळी संदेश चव्हाण याने कोतवाल हरिश्चंद्र देऊलकर यांच्या कामात अडथळा आणून हाताच्या थापटाने कानफटात मारली. याप्रकरणी कोतवाल देऊलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवण येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी संदेश चव्हाण याला न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिने सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच कानफटात मारल्याप्रकरणी १ महिना सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा एका पाठोपाठ एक अशी भोगायची आहे.या निर्णयाविरोधात संदेश चव्हाण याने येथील न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यान, झालेल्या सुनावणीत येथील न्यायालयाने मालवण न्यायालयाने दिलेली शिक्षा अपिलात कायम ठेवली आहे. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता अॅड. अमोल सामंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)ग्रामसेवकांच्या मागण्यांसाठी शासन प्रयत्नशीलनारायण राणे : ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने मांडल्या मागण्याकणकवली : ग्रामसेवकांच्या विविध मागण्या राज्यशासन प्राधान्याने पूर्णत्वास नेईल. मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांच्याशी प्राधान्याने मागण्यांबाबत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाला सांगितले.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. तसेच कामबंद आंदोलनाबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वारंग, सचिव सुनील पांगम, मंगेश राणे, आर. डी. सावंत, पी. डी. जाधव, प्रशांत वर्दम, अमित कांबळे, राकेश गोवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कंत्राटी ग्रामसेवकांवरील अन्याय तसेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, वेतनश्रेणी तसेच प्रवास भत्ता मिळावा, अशा विविध मागण्यांबाबत मंत्री राणे यांच्याशी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना आपल्या बरोबर चर्चा करायला सांगा तसेच सुरू असलेले आंदोलन प्रथम स्थगित करा, असेही मंत्री राणे यांनी यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. (वार्ताहर)
युवकास दंड, शिक्षा कायम
By admin | Published: July 08, 2014 10:54 PM