ओरोस : जिल्ह्यात उद्योग सुरु करण्याची कल्पना डोक्यात असूनही केवळ आर्थिक पाठबळाअभावी उद्योग सुरु न करणाऱ्यांना शासनाने ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या योजनांतर्गत एक नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेंतर्गत उद्योजकतेचा विकास व त्यासाठी पोषक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी लाभ घेऊन विदेश पातळीवरील उद्योजक बना, असे आवाहन डॉ. अरुणा कौलगुड यांनी स्टार्ट अप इंडिया व उद्योजकता जागृती कार्यशाळेत बोलताना केले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुणे व सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शरद कृषी भवनात आयोजित स्टार्ट अप इंडिया आणि उद्योजकता जागृती कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. अरुणा कौलगुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद जठार, मार्गदर्शक विवेक अत्रे, एम.आय.डी.सी असोसिएशनचे अमित वळंजू आदी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविकात प्रमोद जठार म्हणाले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार दररोज ७९ लहान उद्योग आर्थिकदृष्ट्या अस्थिर होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत भारतीय तरुण, महिलांमध्ये नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. देशातील तरुणांनी उद्योजकतेकडे प्रोत्साहित व्हावे आणि त्यासाठी पोषक यंत्रणा निर्माण व्हावी यासाठी स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया योजना शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.डॉ. अरुणा कौलगुड म्हणाल्या की, येथे सौंदर्याचे नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य आहे. मोठी साधनसंपत्ती आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्योजक होण्यास मोठा वाव आहे. त्यामुळे येथील तरुण-तरुणींमध्ये उद्योग सुरु करण्याची कल्पना डोक्यात येते. परंतु त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसल्याने ते उद्योग सुरु होत नाहीत. त्यांना उद्योग सुरु करता यावा यासाठी शासनाने स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उद्योजकांना बँक कर्जाची प्रक्रिया सोयीस्कर करणे आणि अनेक सवलती देण्यात येणार आहेत. विवेक अत्रे म्हणाले की, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया या योजनेतून ग्रामीण भागात विशेष करून दलित महिला, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केला जाणार आहे. योजनेसाठी आपण नाही तर योजना आपल्यासाठी आहेत असे समजून योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु करा. उद्योग सुरु करण्यासाठी इनोव्हेशन, डेव्हलपमेंट, प्रसार, प्रसिद्धी, प्रोसेस यावर महत्वाचा भर द्यावा, असे अत्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)आडाळी येथील २५० हेक्टर जागा अधिगृहीतदोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील २५० हेक्टर जागा शासनाने एमआयडीसीसाठी संपादित केली आहे. या एमआयडीसीत प्रदूषणविरहीत कंपन्यांना बोलविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांसमवेत लवकरच मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही एमआयडीसी पूर्ण होताच जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच नोकरीची संधी मिळणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.
युवकांनी ‘स्टार्ट अप इंडिया’चा लाभ घ्यावा
By admin | Published: June 23, 2016 12:16 AM