सिंधुदुर्गनगरी : एका युवतीवर विविध ठिकाणी वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच लग्न करण्यास व शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून संबंधित युवतीची बदनामी करणारे अश्लील पोस्टर्स लावल्याप्रकरणी आरोपी समीर भगवान जाधव (आरवली-देऊळवाडी, ता. वेंगुर्ला) याला जादूटोणा प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विभा विरकर यांनी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि ११ हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास १०० दिवसांची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, देऊळवाडी येथे राहणारा समीर जाधव हा जादूटोणा व देवदेवस्की करणारा असल्याने पीडित युवती आपल्या शेजारणीसोबत त्याच्याकडे गेली होती.ाा शेजारणीला समीर याने पुन्हा आठ दिवसांनी येण्यास सांगितले व या दोघी पुन्हा आठ दिवसांनी गेल्या असता समीरने पीडित युवतीची सर्व माहिती विचारून घेत तिचा मोबाईल नंबरही घेतला. ‘तू माझी पहिल्या जन्माची बायको आहेस. त्यामुळे तू या जन्मीही माझ्याशी लग्न कर’, असे सांगितले. यानंतर संबंधित पीडित मुलीने समीर याच्याकडे जाणे टाळले. समीरने त्या मुलीला फोन करण्यास सुरूवात केली व तिला रस्त्यात गाठत त्याने जबरदस्तीने आपल्या ताब्यातील चारचाकी (क्र. एमएच ०७-बी ४४७५) गाडीत बसवून वेळागर-शिरोडा येथे नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केली तर दैवी शक्तीच्या आधारे तुला तुझ्या कुटुंबासह ठार मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर ती युवती समीर याच्याशी कोणतेच संबंध ठेवण्यास तयार नसल्याने समीर तिच्या मोबाईलवर मेसेज टाकणे, फोन करणे असे प्रकार करत होता. ही बाब तिच्या घरी आलेला तिचा मावसभाऊ याच्या लक्षात आल्यावर त्याने समीर जाधव याला फोन करून तिला त्रास देण्याचे प्रकार थांबव असे सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी मावसभावाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर समीरने त्या मुलीला ‘बघितलंस माझ्यातील दैवी ताकद. तू माझ्याशी लग्न केले नाहीस आणि संबंध ठेवले नाहीस तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला असेच मारेन’ अशी धमकी दिली. आणि विविध ठिकाणी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या त्या युवतीने समीर याला टाळायला सुरुवात केली व लग्नास नकार दिला म्हणून समीर याने तिचा मृत मावसभाऊ व ती युवती हिचे फोटो एकत्र जोडून त्याखाली अश्लील मजकूर लिहून ते एकत्र करून त्या युवतीच्या विवाहित बहिणीच्या घराच्या गेटवर एक पत्रक लावले आणि दुसरे पत्रक रेडी येथील रस्त्याच्या बाजूला बोर्डवर लावले व त्या युवतीची बदनामी केली. अखेर त्या युवतीने या सर्व प्रकारांना कंटाळून समीर जाधव याच्या विरोधात वेंगुर्ले पोलिस ठाण्यात २३ मे २०१५ रोजी तक्रार दाखल केली. हा सर्व प्रकार एप्रिल २०१४ ते २२ मे २०१५ या कालावधीत घडला. पोलिसांनी समीरच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सध्या समीर हा जामिनावर मुक्त होता. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात आले. यात पीडित मुलगी आणि तिची शेजारीण यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणाचे तपासी अंमलदार म्हणून पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. एस. भांड्ये यांनी काम पाहिले होते.सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्त्या स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
युवकास सात वर्षांचा सश्रम कारावा
By admin | Published: January 12, 2017 11:42 PM