कणकवली : तालुक्यातील कासरल येथे डोंगरातून येणार्या पाण्याच्या पाटाची साफसफाई करत असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गव्याने हल्ला केल्याने त्यात कोरमळावाडी येथील संजय मोहन चोरगे (३२) हा युवक जखमी झाला. त्याच्या कानाला व डाव्या हाताला जबर दुखापत झाल्याने कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
कासरल कोरमळावाडीजवळील डोंगरातून बारमाही वाहणार्या पाटाच्या पाण्याचा वापर नागरिक पिण्यासाठी करतात. या पाटात पडलेला पालापाचोळा बाजूला करण्यासाठी संजय चोरगे हा भाऊ पंढरी चोरगे याला घेऊन गेला होता.
पालापाचोळा बाजूला करत असताना तेथील झुडपांमध्ये असलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अरुंद पाट आणि अचानक गवा अंगावर आल्याने संजय चोरगे याला पळता आले नाही. तोपर्यंत गव्याने मागून शिंगाने त्याला उचलून घेत फेकून दिले. यावेळी सोबत असलेल्या भावाने आरडाओरड केल्याने गव्यानेे पळ काढला.
गव्याची शिंगे लागून संजय चोरगे याच्या उजव्या कानाला तसेच डाव्या हाताच्या खांद्याला जबर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय चोरगे याच्या उजव्या कानाजवळ खोलवर जखम झाली आहे, तर डाव्या डोळ्याच्या खालच्या बाजूचे हाड फ्रॅक्चर झाले होते. गव्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून त्याचा पंचनामा करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. संजय चोरगे हा गवंडी काम करून उदरनिर्वाह करतो. गव्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने सध्या तो उपचार घेत आहे. त्यामुळे या युवकाला वनविभागाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कासरल गावातील ग्रामस्थांतून होत आहे.