मालवण : मालवण शहरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या (फेस्कॉम संलग्न) १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांत ज्येष्ठांनी उत्साहाने सहभाग घेतला. ६० ते ८५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी होताना तरुणांनाही लाजवेल, अशा उत्साहात स्पर्धांत सहभाग घेऊन नंबर पटकावला. ज्येष्ठ नागरिक उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांच्या चालकांनीही आपल्या गाड्या काहीकाळ बाजूला उभ्या करून त्यांना प्रोत्साहन दिले. जलद चालण्याच्याही शर्यतीत ज्येष्ठ महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वर्धापन दिनाची सुरुवात जोशात केली.येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने बादलीत चेंडू टाकणे, रिंगोस्टिक, रस्सीखेच, जलद चालण्याची स्पर्धा, संगीतखुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात अनेक ज्येष्ठांनी सहभाग घेत कार्यक्रमात रंगत आणली. आपल्या आजी-आजोबांचा स्पर्धांतील सहभाग पाहण्यासाठी नातवंडांनीही स्पर्धा मार्गावर गर्दी केली होती. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये अधिकच उत्साह संचारला होता. विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.वर्धापन दिनानिमित्त हॉटेल लिलांजली येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रास्ताविकात संघाच्या वर्षभरातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात अरविंद म्हापणकर यांनी मालवणी भाषेतील गद्यकाव्याद्वारे आपल्या लेखनावर झालेल्या अन्यायाचे विश्लेषण केले. काही सभासदांनी कविता, गाणी सादर केली. काहींनी विनोदी चुटके सांगितले. काहींनी जुन्या आठवणी सांगून कार्यक्रमात रंगत आणली. चंद्र्रकांत गोखले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सर्वांच्या कलागुणांचे विश्लेषण करून कौतुक केले. सूत्रसंचालन प्रकाश कुशे यांनी केले. (प्रतिनिधी)
तरुणांना लाजवले मालवणातील ज्येष्ठ नागरिकांनी
By admin | Published: November 13, 2015 10:54 PM