कुडाळ : कोकणी मेवा जगात पोहोचावा, त्याला बाजारपेठ मिळून येथील शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठीचा कल्याणकारी उपक्रम आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.कोकणातील फळे वाया जाऊ नयेत, त्यांना चांगला दर व चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच येथील शेतकरी आर्थिक सधन व्हावा याकरिता युवा सेनेच्यावतीने कोकणी मेवा खरेदी केला जातो. बाजारभावापेक्षा जास्त दराने हा कोकणी मेवा खरेदी करण्याचा युवा सेनेचा नवा उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर कुडाळ तालुक्यातील हिर्लोक व हुमरमळा येथे संकलन केंद्रे सुरू केली आहेत. या संकलन केंद्र्राचा प्रारंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, विक्रांत सावंत, योगेश धुरी, संदीप म्हाडेश्वर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी खासदार राऊत म्हणाले, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. अनेक मोसमी पिके येथे घेतली जातात. त्यामध्ये कोकम, करवंदे, जांभूळ, हापूस आंबा, फणस, कच्ची कैरी अशा अनेक पिकांचा समावेश आहे. या उत्पादनांना दरासह बाजारपेठ मिळवून दिल्याने या पिकांकडे शेतकरी पुन्हा प्रेरणेने वळणार आहेत. शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीकरिता फळे युवा सेनेकडे जमा करावीत, असे आवाहन त्यांनी केले. संकलन केंद्र्राच्या प्रारंभप्रसंगी शेतकऱ्यांना कोकम रोपांचे वाटप खासदार राऊत यांच्या हस्ते केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीतही उपक्रम सुरू करा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी युवा सेनेने जो उपक्रम हाती घेतला आहे, तो उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातही सुरू करा. सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे राऊत यांनी सांगितले.
युवासेनेचा उपक्रम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी
By admin | Published: May 04, 2017 10:24 PM