मुंबई – मागील आठवड्यापासून राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नुकतेच सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. गणेशोत्सव म्हटला तर तरुणाईचा जल्लोष येतोच. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांमध्ये नवचैतन्य पसरते. तसेच बाप्पाला निरोप देतानाही नाचतगाजत मिरवणूक काढत पुढल्या वर्षी लवकर या अशी साद गणरायाला घातली जाते.
गेल्या काही वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणूक तासनतास निघते. लालबागचा राजा असो वा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका तब्बल १६-१८ तास चालतात. ढोलताशे, वाद्यांच्या तालावर तरुणाई बेभान होऊन नाचते. याच मिरवणुकीसाठी आता मुले-मुली पाहिजेत अशी जाहिरात सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील ही जाहिरात भलतीच चर्चेत आली आहे. पुणेरी स्पीक नावाच्या एका ट्विटर युजरने ही जाहिरात पोस्ट केली आणि पाहता पाहता यावर अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
जाहिरातीत काय म्हटलंय?
गणपती विसर्जन गर्दीमध्ये गणपती डान्स करण्यासाठी फक्त १ दिवस दि. २७ सप्टेंबर १०० मुले मुली पाहिजेत. वय १८ ते ३०, वेळ संध्याकाळी ५ ते १० स्थळ भोसरी, पे ३०० पर डे असं म्हणत संबंधित मोबाईल नंबर दिला आहे.
अनंत चर्तुर्थीला सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध गणेश मंडळे वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक काढतात. काही मिरवणुका तर १५ तासांहून अधिक निघतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये मिरवणुकीचे कव्हरेज मोठ्या प्रमाणात केले जाते. यात प्रसिद्धीही होते. त्यात अशी जाहिरात पाहायला मिळाल्याने नक्कीच विसर्जनाच्या मिरवणुकीत दंग होऊन नाचणाऱ्यांसाठी कमाईची संधीच म्हणावी लागेल. सोशल मीडियात ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर त्यावर युजर्सच्या प्रतिक्रिया तशाच येत आहेत. काहीजण जेवण, नाश्त्याची सोय आहे का? असं काहींनी विचारले आहे. तर नागीन डान्स करून दाखवला तर त्याचे वेगळे पैसे मिळतील का? असे वेगवेगळे प्रश्न पोस्टवर विचारण्यात आले आहेत.