मुंबई: ऑथॉरिटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगच्या (एएआर) कर्नाटक खंडपीठानं रोटी आणि पराठ्यात मोठं अंतर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रोटीवर ५ टक्के, तर पराठ्यावर १८ टक्के जीएसटी लागेल, असं एएआरनं म्हटलं आहे. रोटी आणि पराठ्याच्या वेगळीच व्याख्या करत पराठ्यावर तब्बल १८ टक्के जीएसटी लावण्याचा आदेश देण्यात आला. जीएसटीचं नियमन करताना एएआरनं पराठ्याला १८ टक्क्यांच्या कर टप्प्यात ठेवलं आहे. त्यामुळे आता भोजनालयांमध्ये रोटीवर असलेला ५ टक्के कर कायम राहील. मात्र पराठ्यावर १८ टक्के कर आकारण्यात येईल. पराठा हा खाद्यपदार्थ खाखरा, चपाती किंवा रोटीसारखाच असल्याचं म्हणत त्यावरील कर ५ टक्केच असावा, असं आवाहन एका खासगी अन्न उत्पादन कंपनीनं केलं होतं. मात्र एएआरनं यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं. यानंतर सोशल मीडियावर विनोदांची बहार आली. अनेकांनी पराठ्यावर अन्याय झाल्याचं म्हणत ट्विट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हँड्स ऑफ पराठा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला. अनेकांनी हा हॅशटॅग वापरून त्यांची मतं व्यक्त केली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील यावर भाष्य केलं. अनेकांना पराठा आणि रोटीमध्ये फारसा फरक वाटत नाही. मात्र त्यांच्यावरील जीएसटीमध्ये इतका फरक करण्यात आल्यानं सोशल मीडियावर अनेकांनी याचा समाचार घेतला.
रोटीवर ५, तर परोठ्यावर १८ टक्के कर; नेटकऱ्यांकडून निर्णयाचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 9:07 PM