आता सगळीकडेच मायक्रोवेव्हचा सर्रास वापर होऊ लागला आहे. पण अजूनही अनेकजण याचा वापर करताना काही चुका करतात. अनेकजण चुकीची भांडी यात टाकतात आणि त्यांचा स्फोट होतो. पण आता एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. तुम्हीही जर मायक्रोव्हेवचा वापर करत असाल तर हे वाचाच...
१९ वर्षीय कर्टनी वुड नेहमीप्रमाणे आपला नाश्ता तयार करत होती. तिने मायक्रोव्हेवमध्ये अंडी उकडण्यासाठी ठेवली. पण तिला गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, हीच अंडी तिच्या डोळ्यांची दृष्टी तिच्यापासून हिसकावून घेतील.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या शुक्रवारी घडली. कर्टनी एकटी राहते. तिने नेहमीप्रमाणे मायक्रोव्हेवमध्ये अंडी उकडण्यासाठी ठेवली, काही वेळाने तिने अंडी बाहेर काढली आणि अचानक अंडी फुटून तिच्या डोळ्यांना चिकटली. वाऱ्याच्या वेगाने ती बाथरुममध्ये गेली आणि थंड पाण्याने तिने चेहरा धुतला. पण तिला काही दिसत नव्हतं. काही वेळासाठी तिला काहीच दिसेनासं झालं होतं.
साधारण ४८ तासांनंतर तिला दिसायला लागलं होतं. पण डाव्या डोळ्याने बघायला तिला अजूनही अडचण आहे. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या डाव्या डोळ्याला जास्त इजा झाली आहे. कदाचित तिला या डोळ्याने दिसायला लागण्याची शक्यता कमीच आहे. सध्या कर्टनी उपचार घेत आहे.
का फुटतं अंड?
ब्रिटीश मेडिकल जर्नलने मायक्रोव्हेव कंपन्यांना उकळलेली अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम न करण्याची सूचना मायक्रोव्हेववर लिहिण्यास सांगितले आहे. त्यांच्यानुसार, अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्याने त्याचं तापमान वाढतं. पण मायक्रोव्हेवचे तरंग अंड्याच्या बाहेरील आवरणाला इतकं गरम करु शकत नाहीत की, ते टिचकतील. अशात अनेकदा अंड्यांच्या काही भागात वाफ तयार होते. त्यामुळे अंडी तोडतांना त्यात ब्लास्ट होतो.