जर एखाद्याच्या मनात दृढनिश्चय असेल तर त्याला काहीही करणं कठीण नाही. हे फरीदपूरच्या जेड गावात राहणाऱ्या आठवी पास असलेल्या साहिल अलीने करून दाखवलं आहे. साहिलने स्वत: एक मिनी इलेक्ट्रिक जीप तयार केली आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटर अंतर पार करते. साहिल 19 वर्षांचा आहे. त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. तो गावात टेलरचं काम करतो. त्याचे वडील इंतजाम अली ई-रिक्षा चालवतात.
साहिलने सांगितलं की, त्याला पोलीस जीपच खूप आकर्षण आहे. ती पाहिल्यानंतरच चार-पाच महिन्यांपूर्वी स्वतःची जीप बनवण्याचा विचार त्याच्या मनात आला. पण त्याला ती पोलीस जीपपेक्षा लहान आकाराची करायची होती. याबाबत वडिलांशी बोललं असता त्यांनी नकार दिला. पण, तो आपल्या हट्टावर ठाम राहिला आणि ती बनवण्यासाठी साहित्य आणू लागला. यानंतर त्याच्या वडिलांनीही त्याला हिंमत दिली आणि मग तो पूर्ण झोकून देऊन हे काम करू लागला.
18 दिवसांत पूर्ण
1.25 लाख रुपये खर्च करून जीप बनवण्यासाठी साहित्य गोळा केलं. यानंतर यूट्यूब, कार मेकॅनिकचं दुकान आणि वडिलांची ई-रिक्षा पाहून मिनी जीप बनवण्याचं काम सुरू केलं. तब्बल 18 दिवसांच्या मेहनतीनंतर त्याची जीप तयार झाली. बुलेट बाईकची चेन वेल्डिंग करून त्याने स्टीअरिंग बनवलं. पूर्ण जीप बनवण्यासाठी त्याने कोणाचीही मदत घेतली नाही. ती तयार झाल्यावर फक्त पेंटरकडून रंगकाम करून घेतलं. यासाठी एकूण दीड लाख रुपये खर्च आला.
एका चार्जवर 120 किमी प्रवास
साहिल अलीने सांगितलं की, या मिनी जीपमध्ये चार बॅटरी आहेत. ती चार तासांत पूर्णपणे चार्ज होते आणि जीप एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत धावू शकते. तिचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. त्यात एकावेळी चार जण सहज बसू शकतात. तो जेव्हाही जीप घेऊन बाहेर पडतो तेव्हा लोक त्याकडे बघत राहतात. काही लोकांना ती विकत घ्यायची आहे आणि त्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत पैसे द्यायला ते तयार आहेत, परंतु तो जीप विकणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.