फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून रविवारी एक थक्क करणारा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला पोलिसांनी अडवले तेव्हा त्यातून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या पाहून पोलीस पार चक्रावून गेले. कारण या रिक्षात १, २, ३ किंवा ४ नव्हे तर, चालकासह तब्बल २७ लोक प्रवास करीत होते.
ही घटना कोतवाली बिंदकीच्या लालौली चौकातील आहे. फतेहपूर जिल्ह्यातील बिंदकी कोतवाली परिसरात काही लोक ऑटो रिक्षातून निघाले होते. ऑटोचालक मेहराहा येथील रहिवासी आहे.
पोलीस ऑटोमधून लोकांना उतरवत असतानाच कोणीतरी व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ऑटोरिक्षात २७ जण बसूच कसे शकतात, यावरून सध्या सोशल मीडियासह परिसरातील नागरिकांमध्येही बरीच चर्चा रंगली आहे.
रिक्षा जप्त सर्व लोक ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यासाठी घरातून बिंदकी येथे आले होते. पोलिसांनी एकामागून एक मोजणी करून सर्वांना खाली उतरवले. कारवाई करीत पोलीस रिक्षा जप्त करून पोलीस ठाण्यात घेऊन गेले.