कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मासेमारीवर बंदी आणल्यानंतरही फैरो आयलँडवर वादग्रस्त आयोजन करुन ३०० व्हेल माशांना मारलं आहे. त्यामुळे समुद्रातील पाणी रक्ताने लाल झालं आहे. फैरो द्विप बेट नॉर्वे आणि आयसलँडच्या उत्तरेकडील अँटलांटिकमध्ये आहे. याठिकाणी १८ लहान बेटं आहेत. या क्षेत्रात पारंपारिक पद्धतीनं मोठ्या माशांचे शिकार करण्याचं आयोजन करण्यात येते.
याला ग्राइंडैप अथवा द ग्रांईड नावानं ओळखलं जातं. या आयोजनात व्हेल माशाला नौकेने घेरलं जातं आणि त्याला जाळ्यात अडकवून चाकूने मारण्याची परंपरा आहे. स्थानिक लोक वर्षानुवर्षे अशाप्रकारे माशांचा शिकार करत आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणात अशाप्रकारे माशांच्या हत्येने खळबळ माजली आहे. यूरो न्यूजच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे मासेमारीवर बंदी आणली असली तरी व्हेलिंगच्या काळात या आठवड्यात ३०० व्हेल माशांना मारण्यात आलं.
प्राण्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थांनी अनेक वर्षापासून या आयोजनाला विरोध केला आहे. मात्र फिरोजी सरकार देशातील व्हेलिंग परंपरेला पाठिशी घालत असल्याचं दिसून येते. ते पूर्णपणे "नियमन केलेले" असल्याचा सरकारचा दावा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोक दरवर्षी सरासरी ८०० पायलट व्हेलची शिकार करतात, ज्या व्हेल माशांचा शिकार केला जातो ते दुर्मिळ मासे नाहीत. तसेच व्हेल शिकार हा उत्सव नसून स्थानिक समुदायासाठी पोट भरण्याचा मार्ग आहे असं त्यांनी सांगितले.